नेत्रदान जनजागृतीसाठी सायकल प्रवास!

0

महाड । नेत्रदानाविषयी जनजागृती करत महाडमधील तीन युवकांनी कन्याकुमारी ते महाड, असा 1 हजार 540 कि.मी.चा प्रवास सायकलवरून पूर्ण केला. गुरुवारी महाडमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. युथ हॉस्टेल, विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रवासादरम्यान आलेले अनुभवही तिघांनी विशद केले. महाडमधील मकरंद जोशी, गिरीश हडप आणि पुणे येथील चिन्मय गंधे या तीन तरुणांनी कन्याकुमारी ते महाड, असा जवळपास 1 हजार 540 कि.मी.चा प्रवास 14 दिवसांत सायकलवरून पूर्ण केला. तामीळनाडू, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या चार राज्यांतून हा प्रवास पूर्ण केला. महाडमधील शेडाव नाका ते शिवाजी चौक यादरम्यान विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवत, तर विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाडमधील रोटरी क्लबचे आणि लायन्स क्लबचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते.

अनेक पर्यटकांनी केले उपक्रमाचे स्वागत!
20 नोव्हेंबरला महाडमधील या तीन युवकांनी कन्याकुमारी येथून महाडला येण्यास प्रारंभ केला. जवळपास 14 दिवसांचा प्रवास या तीन युवकांनी केला. या प्रवासादरम्यान, नेत्रदानाबाबत जनजागृती केली. याकरिता त्यांनी एक फलकदेखील तयार केला होता. यामुळे प्रवासात अनेक पर्यटकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. यापूर्वी मकरंद जोशी, गिरीश हडप, चिन्मय गंधे या युवकांनी सायकलवरून इतर स्थळांचादेखील प्रवास केला आहे. कन्याकुमारी ते महाड हा प्रवास जरा खूपच लांबीचा आहे. मात्र, तरीदेखील यांनी प्रती दिन किमान 120 कि.मी.चा पल्ला गाठत हा प्रवास पूर्ण केला.

या प्रवासात आम्हाला पर्यटक आणि तेथील स्थानिक लोकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. नेत्रदान चळवळीबाबत तर अनेकांनी कौतुक केले. तेथे भेटलेला जर्मन पर्यटक म्याक्सी याने तर ही चळवळ आपण जर्मनमध्येदेखील सुरू करू, असे सांगत आमचे कौतुक केले, तर एका ठिकाणी मराठी दाम्पत्यांनी आमचे खाण्याचे बिलही भरले.
– मकरंद जोशी