नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या सदिच्छा नाईकरेचा सत्कार

0

राजगुरूनगर : एकाच शैक्षणिक वर्षात तब्बल दहा प्रकारच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करून शैक्षणिक क्षेत्रात नवीन कीर्तीमान प्रस्थापित करणार्‍या सदिच्छा संजय नाईकरे या विद्यार्थिनीचे सर्वत्र कौतुक होत आहे. उल्लेखनीय यश संपादन करणार्‍या सदिच्छा हिचा खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था आणि कमानवासीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला. खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभापती प्रवीण माटे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात आले. तसेच कमान या तिच्या मूळगावीदेखील तिला सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योगपती बाळासाहेब नाईकरे पाटील, सरपंच अशोक नाईकरे उपस्थित होते.

सदिच्छाचे यश उल्लेखनीय
सदिच्छाने इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 266 गुण मिळवून राज्याच्या गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक मिळवला आहे. त्याशिवाय महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेतही तिने पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. मंथन राज्यस्तर प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात सोळावा व पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. केंद्र सरकार पुरस्कृत जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेतही तिने उज्ज्वल यश संपादन केलेले आहे. फीट जी परीक्षा, गणित, इंग्लिश, विज्ञान व जनरल नॉलेज या विषयांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पियाड परीक्षांमध्येही तिने तीन सुवर्णपदकांची व एका रौप्यपदकाची कमाई केलेली आहे.