नेदरलँड उपपंतप्रधान येणार बारामतीला

0

पुणे – नेदरलँडच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सेंटर फॉर एक्सलंस डेअरी हा देशातील एकमेव प्रकल्प बारामतीत उभारला जात आहे. येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत हा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याची पायाभरणी माळेगाव येथे शुक्रवारी २५ मे’ला होत आहे. या कार्यक्रमासाठी नेदरलँडचे उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन हे स्वतः उपस्थित राहणार आहेत.

देशातील एकमेव प्रकल्प

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीष बापट, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रधान सचिव विजकुमार, पशुसंवर्धन सचिव डॉ. कुरुंदकर, आयुक्त कांतिलाल उमाप, राहुरी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी विश्वनाथ, ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार यावेळी उपस्थित राहतील. यानंतर शारदानगर येथील आप्पासाहेब पवार सभागृहात औपचारिक कार्यक्रम होईल. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून हा देशातील एकमेव गोवंश सुधार प्रकल्प होणार आहे.

या प्रकल्पासाठी ट्रस्टचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे यांनी नेदरलँड सरकारशी चर्चा करुन तेथील डेअरी तंत्रज्ञान देशात आणण्यासाठी सादरीकरण केले होते. त्यानुसार नेदरलँड आणि महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पास मान्यता दिली. या प्रकल्पात देशी गीर गायी आणि पंढरपूर म्हशीवर संशोधन होणार आहे. दूध, शेण आणि गोमूत्रावर येथे संशोधन होणार आहे. देशी उत्पादनाचे ब्रॅण्डिंग होण्यास यामुळे मदत होईल. ब्राझीलप्रमाणेच उत्तम आणि दर्जेदार गायी तयार होण्यासाठीही याठिकाणी संशोधन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम प्रमुख धनंजय भोईटे, प्रकल्प प्रभारी प्रा. निलेश नलावडे पाहणार आहे.