चँगवॉन- हरयाणाचा नेमबाज अंकुर मित्तलने भारताला जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकविले आहे. हा ऑलिम्पिक इव्हेंट नसल्यामुळे अंकुरला 2020 चा ऑलिम्पिक कोटा मिळाला नाही. याच गटात भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
26 वर्षीय अंकुरने शुटऑफमध्ये चीनच्या यियांग यांगचा पराभव केला. 75 फेऱ्यानंतर अंकुर आणि यियांग यांचे गुण 140 असे समसमान झाले होते. अंकुरने पाचव्या फेरीत पैकीच्या पैकी 30 गुणांची कमाई करताना स्वतःला सुवर्णपदकाच्या शर्यतीत कायम राखले. तिसऱ्या स्थानावर असलेल्या स्लोव्हाकियाच्या हुबर्ट आंद्रेज ओलेंनिकनेही 140 गुणांची कमाई केली होती. त्यामुळे शुटऑफमध्ये अंकुरने चार लक्ष्य अचूक साधत सुवर्णपदक जिंकले. यियांगला तीन, तर ओलेंनिकला एकच लक्ष्य साधता आला आणि त्यामुळे त्यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
सांघिक गटात भारताला 409 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघात अंकुरसह असाब मोहम्मद, शार्दूल विहान यांचा समावेश होता. सांघिक गटात इटली ( 411) आणि चीन ( 410) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले.