चँगवॉनः जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारताने आज शुक्रवारी दोन सुवर्णपदक जिंकली. भारताच्या विजयवीर सिधूने कनिष्ठ गटातील 25 मीटर स्टँडर्ड पिस्तुल प्रकारात 572 गुणांसह वैयक्तिक गटाचे सुवर्णपदक नावावर केले. याच प्रकाराच्या सांघिक गटात विजयवीरने राजकनवर संधू व आदर्श सिंग यांच्यासह 1695 गुणांसह सुवर्णपदक जिंकत भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली.
भारताच्या या कनिष्ठ खेळाडूंनी चीन व कोरिया यांचे कडवे आव्हान परतवून लावले. वैयक्तिक गटात विजयवीरने कोरियाच्या गनहीयोक ली ( 570) आणि चीनच्या हाओजे जहू ( 565) यांना पराभूत केले. दोघांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सांघिक गटात भारताने 1695 गुणांसह वर्चस्व गाजवले, परंतु कोरियन संघाने त्यांना कडवी टक्कर दिली. अवघ्या दोन गुणांच्या फरकाने कोरियाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चेस प्रजासत्ताक संघाला 1674 गुणांसह कांस्यपदक जिंकण्यात यश आले.
तत्पूर्वी, पुरुषांच्या 25 मीटर स्टँडर्ड पिस्तुल प्रकारात भारताच्या गुरप्रीत सिंगने रौप्यपदक जिंकले. त्याने 579 गुणांची कमाई केली. या पदकांसह भारताच्या खात्यात 11 सुवर्ण, 9 रौप्य आणि 7 कांस्यपदकं जमा झाली आहेत.