मुंबई । भारतीय वायुदलाच्या दीपक कुमारने एका अटीतटिच्या लढतीत पंजाबातील अंजुम मौदगील हिचा 24व्या आणि अंतिम शॉट मध्ये 0.2 गुणांच्या फरकाने पराभव करून आर.आर. लक्ष्य कप या निमंत्रितांच्या नेमबाजी स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचे आयोजन माजी ऑलीम्पियन सुमा शिरूर संचालित लक्ष्य शूटिंग क्लबने कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी पनवेल येथे केले होते. आपले गुरु द्रोणाचार्य पुरस्कार विजेते संजय चक्रवर्ती यांना समर्पित केलेल्या या स्पर्धेत एकंदरीत 1.65 लाखांचे रोख पुरस्कार देण्यात आले. त्यापैकी रुपये 50 हजारांचा लाभ दीपक कुमारला झाला. उपविजेत्या अंजुमला 30 हजार तर तृतीय स्थान प्राप्त केलेल्या सिम्रात चहल (राजस्थान) हिला 20 हजार रुपयांची पारितोषिके मिळाली. या स्पर्धेतील ज्युनियर विभागामध्ये पुण्याच्या वेध अकादमीचा शाहू माने विजेता ठरला. त्याच्या पाठोपाठ महाराष्ट्र क्रीडा प्रबोधिनीचे विनय कुमार पाटील आणि नुपूर पाटील यांना अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान प्राप्त झाले.
या विभागातील विजेत्यांना अनुक्रमे 25 हजार, 15 हजार आणि 10 हजार असे रोख इनाम प्रदान करण्यात आले. निमंत्रितांच्या प्राथमिक स्पर्धेत दीपक कुमार (626.4) गुनानिशी अग्रक्रमावर होता आणि तेच स्थान कायम राखताना 248.5 अशा एकूण गुणांची नोंद केली तर अंजुमने 248.3 गुणांसह द्वितीय स्थान पटकावले. तेविसाव्या शॉटच्या अखेर या दोघांमध्ये 237 अशी बरोबरी होती. अंजुमने अंतिम फेरीत जोर मारताना प्राथमिक फेरीमध्ये तीला मागे टाकणारा प्रतिक बोरसे (623.4) आणि विनिता भारद्वाज (623.8) यांना मागे टाकले. अंजुमची प्राथमिक फेरीतील गुणसंख्या 622 होती आणि ती सातव्या स्थानावर होती.
शाहू मानेने 625.2 या गुणांसह अंतिम फेरी गाठली होती तर विनय कुमार(617) आणि नुपूर (615.5) हे अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर होते. शाहूने आपले सातत्य कायम राखत अंतिम फेरीत 247.8 गुणांची नोंद केली. विनय कुमार पाटीलने 246.4 एवढी गुणसंख्या नोंदविली. स्पर्धेमध्ये काही विशेष पुरस्कार देण्यात आले. त्यात सर्वाधिक 54 दहा इनर मारल्याबद्दल दीपक कुमारला, सर्वाधिक 10.9चे चार शॉट मारणार्या तेजस प्रसादला आणि 105.4ची सर्वोत्तम सिरीज मारणार्या अखिल शेरोनला प्रत्येकी 5 हजाराचे पुरस्कार मिळला.