माननीय नेमाडे सर, परवा जळगावात येत तुम्ही पुन्हा (?) मराठी माध्यमांच्या शाळांबद्दल, मुलांना प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले पाहिजे. याबाबत तसेच इंग्रजाळलेली शिक्षण व्यवस्था समाजासाठी कशी घातक आहे. यासंबंधी भरभरून बोललात खूप बरं वाटलं. इंग्रजीचे प्राध्यापक असूनही आपण मराठी भाषेविषयी, मराठी माध्यमांच्या शाळांविषयी (अजूनही) छानसं बोलताय व भरकटलेल्या पालकांना जे मार्गदर्शन करताय, तेही भावलं पण प्रश्न आहे. तो एकच सर आपण जळगावसह महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये जात ‘स्टेज’ गाजवतात. गरिबांची (तीदेखील मराठी) मुलं कोसला, हिंदु कादंबर्या विकत घेत कशा वाचतात व तुम्हाला (देव मानतात) भेटतात. हे तुम्ही खूप रंगवून सांगतात. ‘ज्ञानपीठापेक्षा मला ते बक्षीस मोठ वाटतं’हेही रंगवून सांगतात. पण कधीही एखाद्या ‘प्रयोगशील’ मराठी माध्यमाच्या शाळेला भेट देत. तिथल्या प्रयोगशील, मेहनती शिक्षकांना ‘शाबासकी’ देत चर्चा करत नाहीत. मला त्याबद्दल खूप वाईट वाटतं.
‘सर मराठी साहित्यवर्तुळात तुम्ही ‘बाप माणूस’ म्हणून खरंच प्रसिध्द आहात. कुणी कितीही (माझ्यासकट अनेकांनी) टीका केली तरी जे मांडायचं (?) ते तुम्ही मांडत पुढे जात राहतात व बिनधास्त बोलत बाजी मारतात. आज तुमच्या नावाला खूप वजन महत्त्व आहे. त्या वजनाचा जर आपण वापर केला व मराठी माध्यमांच्या शाळांचे प्रश्न जर समाजावून घेत त्यावर कडक भाष्य करत उपाय सूचवले तर खरंच मराठी शाळांचा, शिक्षकांचा ऊर अभिमानाने भरुन येईल.
सर पुण्यातील साहित्यिक (जे कमी वाचतात, जास्त लिहितात व त्याला दर्जा ‘नसतो’ असं तुमचं मत!) मंडळीवर तुम्ही तुटून पडतात, हे एकवेळ मान्य करु या. पण त्याच पुण्यात ‘अक्षरवंदन’ ही नावाजलेली मराठी माध्यमाची एक प्रयोगशील आहे ( व ती बंद करण्याचा घाट घातला गेला होता वगैरे) व ती अप्रतिम कार्य करतेय, हे वाचून तुम्ही त्या अक्षरनंदनला कधी भेट का दिली नाही? असर ज्ञान प्रबोधिनी अक्षरवंदन ‘कमल निंबकर बालभवन, ग्राममंगल, सृजन आनंद विद्यालय, विज्ञानश्रम, आनंद निकेतन विद्यालय, गरवारे बालभवन, श्रमिक सहयोग, राजा/रेणू दांडेकर यांची टिळक शाळा (चिखलगाव)… यासारख्या महाराष्ट्रातील वा त्या त्या जिल्ह्यातील शाळा यांना तुमच्यासह 10-12 (मराठी) साहित्यिकांनी स्वखर्चाने भेटी देत त्यांचा उत्साह वाटवायचा नाही तर कुणी?. सर तुम्ही तुमच्या नातवंडांसाठी ज्या मराठी सेमी शाळा निवडल्याय त्याबद्दल तुमच्य लेकासह तुमचंही अभिनंदन पण त्या शाळांना भेट देत तेथील (आसपासच्या चारदोन शाळांना) प्रयोग समजावून घेण्याची थोडीशी तसदी तुम्ही का घेत नाही? तसेच तुम्ही जी (विविध) पारितोषिक जाहीर करतात तिथे प्रयोगशील मराठी शाळा, शिक्षक त्यांच मराठीतलं (प्रयोगशील) लेखन यांना का स्थान देत नाही? सर मी, माझं उदाहरण देतो. (जे तुम्हाला माहित आहे.) शैक्षणिक प्रयोगांवर आधारित मराठीत कादंबरी लेखन करणारा मी पहिला शिक्षक (कादंबरीकार नव्हे!) तुमच्यासह मराठीतील 4/5 लेखक, कांदबरीकारांना (त्यात पुण्याचे मित्र संजय भास्कर जोशी हेही आलेच) त्यासंबंधी का लिहिता आले नाही? पुरस्कार मला नकोय) कारण एकच मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये जे प्रयोग सुरू आहेत.
चंद्रकांत भंडारी- 9890476538