नेरमधील जैन मंदिरातील चोरी प्रकरणी मध्यप्रदेशातील सात दरोडेखोर जाळ्यात

0

एक लाखांची दहा किलो चांदी जप्त ; धुळे तालुका व गुन्हे शाखेची कारवाई

धुळे- तालुक्यातील नेर येथील जैन मंदिरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दानपेटीची चिल्लर लांबवल्याची घटना 12 ऑगस्ट 2018 रोजी घडली होती. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू होता. हा गुन्हा मध्यप्रदेशातील सेंधवाजवळील मोहाला व वायक्याच्या टोळीने केल्याची माहिती निष्पन्न झाल्यानंतर सुरूवातीला 24 डिसेंबर रोजी गौतम उर्फ शोभाराम खुमसिंग भिलाला (26, मोहाला) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने साथीदारांची नावे सांगितल्यानंतर एक-एक करून सात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींना 24 ते 2 जानेवारीपर्यंत मिळालेल्या पोलिस कोठडीत त्यांनी एक लाख रुपये किंमतीची दहा किलो चांदी काढून दिली तर उर्वरीत सोन्याचे दागिने अन्य दोघा पसार आरोपींकडे असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांनी मंगळवारी पत्रकार परीषदेत दिली.

संवेदनशील गावातून आरोपींच्या आवळल्या मुसक्या
मध्यप्रदेशातील मोहाला व वायक्यातील कुविख्यात टोळीच्या मागावर पोलिस होते मात्र पोलिसांवर होणारे हल्ले पाहता व गावातील एकूणच संवेदनशील परीस्थितीचे गांभीर्य ओळखत साध्या वेशातील पोलिसांना पाठवून आरोपींचा मागोवा घेवून त्यांना एक-एक करीत अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या आरोपींना पोलिसांकडून अटक
गौतम उर्फ शोभाराम खुमसिंग भिलाला उर्फ मोरे (26, मोहाला), राधू बांगड्या डावर (भिलाला, 26), गंगाराम उंदर्‍या भांगड्या (तडवी, 30, मोहाला, ता.सेंधवा), झिना अमरसिंग डावर (22), गणेश उर्फ दगड्या नांदला सोलंकी (भिलाला, 26), डुडल्या उर्फ गंगाराम केर्‍या सोळंकी (23), मन्या उर्फ मोहन भुरला भिलाला (सोळंकी, 45, रा.वाकीया, ता.सेंधवा) या सात कुविख्यात दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून त्यांचे साथीदार जतन रूमसिंग तडवी (मोहाला, ता.सेंधवा) व टेपा (पूर्ण नाव, गाव माहित नाही) पसार असून त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, साक्री उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिवाणसिंग वसावे, उपनिरीक्षक राहुल गवई, उपनिरीक्षक अनिल पाटील, सुनील विंचूरकर, नथ्थू भामरे, सतीश कोठावदे, मनोज पाटील, चेतन कंखरे, मनोज ईशी, गोविंद पावरा, देसले आदींच्या पथकाने केली.