कर्जत (कांता हाबळे )। रायगड जिल्ह्यात बहुतांश आदिवासी भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. कर्जत तालुक्यातील नेरळ शहरामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मोठ्या प्रमाणात आदिवासी भागातून रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात कमी खर्चात उपचार मिळावे या आशेने येतात. परंतु, नेरळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यावर रुग्णांची निराशा होत आहे. या आरोग्य केंद्राला समस्यांनी ग्रासल्याने हे आरोग्य केंद्रच व्हेंटिलेटरवर असल्याची ओरड सध्या नागरिकांमधून होत आहे. 10 बेड असलेल्या या आरोग्य केंद्रात आता हे बेड कमी पडत असल्याने गरोदर मातेला चक्क जमिनीवर गादी टाकून झोपवून उपचार देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच इथे घडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नेरळ परिसरातील गोर-गरीब गरजू रुग्णांना वेळीत उपचार मिळावेत, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली आहे. परंतु, नेरळ प्राथमिक आरोग्य नेहमीच रुग्णांना सोयी-सुविधा देण्यास अपुरे पडत आहे. त्यामुळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच चर्चेत राहिले आहे.
आरोग्य केंद्राच्या नुतनीकरणासाठी 23 लाख रुपयांचा निधी खर्च
कधी वैद्यकीय अधिकारी पद रिक्त तर कधी कर्मचार्यांची पदे अपूर्ण अशा एक ना अनेक समस्यांनी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रासले आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व शासनाने सपशेल दुर्लक्ष केले आहे.काही महिन्यांपासून रायगड जिल्हा परिषदेकडून या आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणासाठी 23 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे.
लाखो रुपये खर्चून सुधा आरोग्य केंद्र आजही आजारीच असल्याचे चित्र आहे. अपुर्या कर्मचारी संख्येमुळे रुग्णांची गैरसोय, सफाई कामगारांअभावी स्वच्छतेचा बोजवारा, शौचालयाची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण आरोग्य केंद्रातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक नाक मुठीत धरून फिरत आहेत. हे आरोग्य केंद्रच व्हेंटिलेटरवर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रुग्णवाहिका अनेक महिन्यांपासून नादुरस्तच
एका टुब्लाइटवर बिना पंख्याच्या प्रसूती इथे कराव्या लागत आहेत. ठिकठिकाणी वायरी व बोर्ड उघड्या अवस्थेत आहेत. शावविच्छेदन कक्ष 4 वर्षे झाली. वाट पाहत आहे, तर रुग्णवाहिका अनेक महिन्यांपासून नादुरस्त असल्याने रुग्णवाहिका ठेवण्याच्या जागेत कुत्र्यांनी संसार मांडला आहे.
…तरी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडे लक्ष देऊन येथे येणार्या रुग्णांना योग्य त्या सोयीसुविधा पुरवाव्यात जेणे करून या गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागणार नाही, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून केली आहे.
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 23 लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. असे असताना दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरु आहे, त्यामुळे रुग्णाची मोठ्या प्रमाणात द गैरसोय होत आहे तसेच कर्मचार्यांचा अभाव व सफाई कामगार नसल्याने रुग्णालयात मोठ्या
प्रमाणात दुगर्ंधी पसरली आहे.
– गणेश शेळके,
मानवधिकार संघटना उपाध्यक्ष कर्जत
रुग्णवाहिका नादुरुस्त आहे, दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. इलेक्ट्रिकचे काम बाकी असल्याने तेथे बेड टाकण्यात आले नाही त्यामुळे त्या महिलेला गादी टाकून जमिनीवर उपचार देण्यात आले. तसेच सफाई कामगार रजेवर असल्याने अडचणी येत आहेत परंतु लवकरात लवकर रुग्णांना योग्य त्या सोयी-सुविधा पुरवल्या जातील.
– डॉ. रमेश गवळी
वैद्यकीय अधिकारी, नेरळ