कर्जत : कर्जत तालुक्यातील महत्वाच्या नेरळ-कळंब जिल्हा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना याच मार्गावरील नेरळ साईमंदिर परिसरातही रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. तसेच रस्ताही खचला आहे. परंतु याकडे बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. नेरळ-कळंब हा महत्वाचा जिल्हा मार्ग आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरुची असते. परंतु रस्त्याची दुरावस्था झाली असताना बांधकाम विभागाने झोपेचे सोंग घेतल्याचे यावरून दिसून येत आहे. या रस्त्यावरील साईमंदिर परिसरात मागील वर्षी रस्त्याच्या कडेला जेसीबीच्या साहाय्याने पाणी जाण्यासाठी नाल्या काढण्यात आल्या होत्या. परंतु यावर्षी पाणी जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्याने सर्व पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. आणि त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याच रस्त्यावरील दहिवली पुलावर दोन दिवसांपूर्वी जेसीबी लावून पडलेल्या खड्ड्यांचे थातूर-मातूर केले होते, परंतु पुन्हा पुलांवरील रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.
खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी
याच रस्त्यावर पुढे काही भाग खचला आहे. त्याठिकाणी मोठं मोठे दगड ठेवण्यात आले आहे. परंतु येथून भरधाव वेगाने जाणार्या वाहनचालकाना हा खड्डा न दिसल्यास व रात्रीच्यावेळी येथे अपघात घडू शकतो. त्यामुळे हा खचलेला रस्ता चांगल्या दर्जाचा कधी करणार असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना पडला आहे. या संपूर्ण नेरळ-कळंब रस्त्याची खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली असताना बांधकाम विभागाने याकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. तरी बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन खचलेला रस्ता, व रस्त्यावर पडलेल्या खड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून केली जात आहे.