एसटी कर्मचार्यांना होतोय त्रास, नेरळ पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
कर्जत । कर्जत आगारच्या अंतर्गत येणारे नेरळ बस स्थानक महत्वाचे बस स्थानक म्हणून ओळखले जाते. एकेकाळी एसटीचा मिनीडेपो अशी नेरळ बस स्थानकाची ओळख होती. परंतु सध्या नेरळ बसस्थानक हे अतिक्रमणाच्या आणि पार्किंगच्या विळख्यात सापडले आहे. याचा त्रास प्रवाशांसह एसटी कर्मचार्यांना होत आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप एसटी कर्मचारी आणि आणि प्रवाशांकडून केला जात आहे. सुमारे तीन दशकापासून अधिक काळ प्रवासी सेवा करणार्या एसटी बस सेवेची वाताहत होण्यास अनेक कारणे असली तरी एसटीला सदर जागा संपादित करता न आल्याने ही सार्वजनिक सेवा अक्षरशः उपरी ठरली आहे. नेरळ शहराच्या पूर्वेस असलेल्या हा भूखंड धामोते हद्दीत येत असल्याने कागदोपत्री ही जागा ज्या व्यक्तिच्या नावे आहे. त्या व्यक्तीशी संपर्क साधला जात नाही. त्यामुळे हा भूखंड अतिक्रमणाच्या आणि पार्किंगच्या विळख्यात सापडले आहे आणि याचा त्रास नागरिकांना होत आहे.
एसटी आगार प्रमुख नेरळ बसस्थानकाकडे फिरकलेच नसल्याने अडचणी
या बस स्थानकात खाजगी वाहने बेकायदेशीर थांबवली जातात. तसेच परिसरातीन रिक्षाचालक प्रवाशांना सोडण्यासाठी थेट बस स्थानकात आपली वाहने नेत असल्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होत आहे. नेरळ पोलिसांकडून तात्पुरत्या स्वरूपाची करवाई होते. मात्र परिवहन मंडळाचे अधिकारी व पोलीस यांचा समन्वय नसल्याने परिस्थिती जैसे थे च आहे. नव्याने रुजू झालेले कर्जत एसटी आगार प्रमुख नेरळ बस स्थानकाकडे फिरकलेच नसल्याने अडचणी अधिकच वाढत चालल्या आहेत. येथील अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायतीकडून कारवाईचा प्रतिसाद मिळत नसल्याने ही सार्वजनिक सेवा टिकणार कशी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
कारवाई करण्याची मागणी
स्थानिक लोकप्रतिनिधी, आगार प्रमुख आणि नेरळ पोलिसही याकडे लक्ष देऊन या नेरळ बस स्थानकातील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच बस स्थानकात अनधिकृत पार्किंग करणार्या चार चाकी व दुचाकींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एसटी कर्मचारी आणि प्रवाशांकडून केली जात आहे.