नेरीला कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

जामनेर:तालुक्यातील नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी, 10 मार्च रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर होणार्‍या कोरोना लसीकरण कार्यक्रम मोहिमेचा तालुकास्तरीय शुभारंभ करण्यात आला. तालुक्यात प्राथमिक केंद्र स्तरावरील सर्वात पहिली लस माजी जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे आणि जि.प. सदस्या विद्या खोडपे यांना आरोग्य सहाय्यिका जयश्री कुलकर्णी यांच्याकडून देण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार अरुण शेवाळे, गटविकास अधिकारी जे.व्ही.कवळदेवी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश पाटील, डॉ. सारिका भोळे, सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

लस घेतल्याबद्दल दिलीप खोडपे यांचे तहसीलदार व विद्याताई खोडपे यांचे गटविकास अधिकारी यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
60 वर्षेवरील सर्व नागरिकांना व 45 वर्षेवरील कोमॉरबीड ज्यांच्याकडे रजिस्टर प्रॅक्टिशनर यांचे प्रमाणपत्र आहे त्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर कोरोना लस दिली जाईल. ही प्रक्रिया ऑनलाईन व अ‍ॅपवर आधारित असल्याने यामध्ये बर्‍याच वेळा तांत्रिक अडचणी येऊ शकतात. नागरिकांनी सहकार्य करुन मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, एकमेकांपासून अंतर ठेवणे व गर्दी न करणे व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे ह्या नियमांचे पालन लस घेतल्यानंतर नागरिकांनी करणे आवश्यक असल्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले आहे.