नगरदेवळा। येथून जवळच असलेल्या नेरी येथील माध्यमिक विद्यालयाची गळतीमुळे अतिशय दैनावस्था झाल्याने संतप्त पालक व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. नगरदेवळा येथून जवळ असलेल्या नेरी गावात राजमाता जिजाऊ भोसले माध्यमिक शिक्षण संस्था असून या परिसरातील ग्रामीण भागातील शेकडो गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. एकीकडे शासन डिजिटल इंडिया डिजिटल शाळांकडे वाटचाल करीत असतांना मात्र नेरी येथील शाळेची भग्नावस्था आहे. गेल्या 2 दिवसांपासून वरूणराजाचे पुनरागमन झाल्याने शाळेला अक्षरशः गळती लागली आहे. अश्या गाळतीमध्येच शिक्षक छत्री घेऊन शिकवीत होते व विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे चित्र बघावयास मिळाले.
डिजिटल काळातही शाळांची भग्नावस्था
शाळा गळत असल्याचे पाहून संतप्त पालक व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. याबाबत 3 ते 4 महिन्यांपासून वारंवार शिक्षणाधिकारी श्री महाजन व संस्थाचालक श्याम शिंपी यांना लेखी व तोंडी तक्रारी करून देखील बघ्याची भूमिका घेत आहेत. दुर्दैवाने शाळेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून शाळेस कुलूप ठोकत आहोत व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न करता ताबडतोब पर्यायी व्यवस्था करावी, असा सवाल नेरी येथील संतप्त नागरिक करीत आहेत. एकीकडे डिजिटल इंडिया, केंद्र शासन डिजिटल शाळेचा गवगवा करीत आहे तर दुसरीकडे संस्था चालक शिक्षक भरतीचे लाखो रुपये घेऊन विद्यार्थीच्या जीवाशी खेळ करीत आहेत. या गंभीर प्रकरणाकडे शिक्षणाधिकार्यांनी लक्ष देऊन कारवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.