नेरुळ पूर्वेकडील दोन मोठे शिल्पचौक ठरताहेत त्रासदायक

0

नेरुळ । सेक्टर 9 येथे बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या समोर असलेल्या चौक तसेच डी. वाय. पाटील समोर असलेल्या शिवाजी चौक यासाठी अनावश्यकरीत्या व्यापलेल्या जागेमुळे वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण होत आहे. तीन पदरी मार्गावर हे दोन चौक उभारलेले आहे. मात्र, या चौकांमुळे व्यापलेल्या जागेमुळे या वर्दळीच्या मार्गावर वाहतूक प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. माजी आयुक्त तुकाराम मुंढे असताना वॉक विथ कमिशनरमध्ये याबाबत येथील नागरिकांनी तक्रार केली होती.लागलीच मुंढे यांनी याबाबत बदल करण्याबाबत मुख्य अभियंता मोहन डगावकर याना आदेश दिले होते. मात्र, अद्याप यावर तोडगा काढण्यात आलेला नाही.नेरुळ पूर्वेला सेक्टर येथे हे दोन चौक उभारण्यात आले आहेत. यावर मोठ्या शिळांची कलाकुसर करून याला सुंदर रूप देण्यात आले आहे. मात्र, या शिल्पांच्या भोवती आलेल्या अनावश्यक मोठ्या व्यासामुळे येथील तीन पदरी रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण होत आहे.

वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने बदल व्हावा
नवी मुंबईने पालिकेने अनेक चौक सुशोभित केलेले आहेत. त्यामुळे पालिकेच्या परिसरात सौंदर्यात भर पडलेली आहे. हे चौक तयार करण्यात आले त्यावेळेस नवी मुंबईतील लोकसंख्या कमी होती. एकंदर परिस्थतीमुळे येथील नागरिकांनी आयुक्त मुंढे यांच्याकडे केलेली तक्रार रास्त ठरत आहे. अशा या महत्त्वाच्या मार्गावर पालिकेने लागलीच दखल घेऊन येथील चौक आणि त्यांचा अनावश्यक वाढवलेला व्यास कमी करण्याची गरज आहे. वाढती लोकसंख्या आणि भविष्याच्या दृष्टीने यात बदलाची गरज असून, या गजबजलेल्या मार्गावरील वाहतूककोंडी कमी होऊन मार्ग मोकळा होईल.

आम्ही याबाबत वाहतूक पोलिसांबरोबर मीटिंग घेऊन कोणते चौक हे रहदारीच्या दृष्टीने अडचणीचे ठरत आहेत याबाबत चर्चा करणार आहोत. यात शहरातील कोणते, चौक किंवा त्यांची लांबी कमी करायची आहे हे ठरविण्यात येणार आहे. नेरुळमधील या चौकांबद्दल तक्रारी आलेल्या आहेत. लवकरच वाहतुकीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यात येईल.
-रमेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त(सेवा)
नवी मुंबई महानगरपालिका