नेरुळ रेल्वेस्थानकाजवळील पदपथ फेरीवाल्यांनी व्यापले

0

नेरुळ । नेरुळ रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील भागात फेरीवाल्यांनी आपले बस्तान बांधले आहे. त्यामुळे पालिकेच्या आदेशानुसार एनएमएमटी बस डेपोच्या समोर मंडईत स्थलांतर केलेल्या फेरीवाल्यांचे नुकसान होत आहे. येत्या काळात या फेरीवाल्यांमध्ये अनधिकृत विरुद्ध अधिकृत असा वाद चघळण्याची चिन्हे आहेत. रेल्वे स्थानकाला लागूनच पादचार्‍यांना पूर्व व पश्चिमेला जाण्यासाठी पूल आहे. मात्र पश्चिमेकडून पुर्वेला जाताना खाली उतरल्यावर संबंध पदपथ या अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापलेला आहे. त्यामुळे येथे नागरिकांना चालणे मुश्किल होत आहे. पदपथाच्या दोन्ही बाजूला पदपथावरच आपले बसताना बसवल्यामुळे नागरिकांना येथून चालताच येत नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावरून चालावे लागते. तसेच येथील रस्ता अरुंद असल्यामुळे नागरिक या रस्त्यावरच गाड्या लावून खरेदीसाठी भाजी घेत असल्याने येथे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.

नेरुळ विभाग जवळच असताना कारवाई नाही
संध्याकाळी तर येथे उभे राहण्यास जागा नसते एवढे विक्रेते येथे बसलेले असतात. मुख्य म्हणजे पालिकेचा नेरुळ विभाग येथ हाकेच्या अंतरावर असताना ही येथे कारवाई का होत नाही? त्यामुळे पालिका करते काय? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. याठिकाणी आधी सर्व फेरीवाले बसत होते. पालिकेने त्यांना नेरुळ एनएनएमटी बस डेपोच्या समोरील जागेत मंडई बांधून देऊन पदपथ रिकामे करण्यात यश मिळवले होते. मात्र आता या पदपथावर आता अनधिकृत फेरीवाल्यांनी ताबा घेतला आहे. त्यामुळे पालिकेच्या आदेशानुसार आपले बस्तान बस डेपो समोर हलवलेल्या भाजीविक्रेत्यांचे नुकसान होत आहे. आयुक्त मुंढे असताना पदपथांवर विक्रेते किंवा फेरीवाले बसण्यास धजावत होते. याच पदपथावर वॉक विथ कमिशनरच्या तक्रारीनंतर नेरुळ विभागाच्या अधिकार्‍यांनी धसका घेत चक्क रविवारी कारवाई केली होती. त्यामुळे येथील पदपथ रिकामे झाले होते.

सुरक्षा रक्षक नावापुरते
या ठिकाणी पालिकेने कारवाई केल्यावर देखील पुन्हा हे फेरीवाले बसत आहेत. रेल्वे तसेच सिडकोचे सुरक्षा रक्षक यासाठी नेमण्यात आलेले आहेत. मात्र हे सुरक्षा रक्षक नावाला असल्यासारखे वावरत असून या फेरीवाल्यांकडून हाफटीपोटी मोफत भाजी किंवा फळे घेतली जात असल्याची तक्रार नागरिक कार्य आहेत.याचा फायदा घेऊन व माजी आयुक्त मुंढे गेल्यानंतर अधीकारी वर्ग सुस्त झाल्यामुळे फेरीवाल्यांनी हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.

या ठिकाणी नियमित कारवाई सुरू आहे. येथे फेरीवाले बसू नयेत म्हणून सिडको व रेल्वेच्या सुरक्षा रक्षकांना येथे लक्ष देण्यास सांगितले आहे. मात्र याठिकाणी सतत करावी चालू ठेवून पदपथ मोकळे ठेवण्यात येतील.
-चंद्रकांत तायडे, विभाग अधिकारी, नेरुळ