नवी मुंबई : नेरुळ (प्र. क्र. 90) येथील काँग्रेस नगरसेविका मीरा पाटील यांनी डी. वाय.पाटील महाविद्यालय आणि स्टेडियम लगतच्या रस्त्याच्या बाजूला असणार्या हरित पट्ट्याच्या (ग्रीन बेल्ट) ठिकाणी कायमस्वरूपी वाहन पार्किंगची व्यवस्था (पार्किंग प्लाझा) महापालिकेतर्फे उभारण्याची मागणी केली आहे.
सायन-पनवेल महामागानजिकच्या नेरूळ येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या आवारात वाणिज्य स्वरूपाचे स्टेडीयम आहे. याठिकाणी अनेकवेळा विविध कार्यक्रम होत असतात. सदर, कार्यक्रमासाठी येणार्या प्रेक्षकांची वाहने आजूबाजूच्या वसाहतींच्या आवारात बेशिस्त व बेकायदेशीरपणे प्रेक्षकांकडून उभी केली जातात. ज्याचा नाहक त्रास स्थानिक रहिवाश्यांना सहन करावा लागतो. येत्या वर्षात या स्टेडीयममध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने होणार आहे. त्यामुळे, या परिसरात वाहनाची ये-जा वाढेल आणि स्थानिक नागरिकांसोबतच नवी मुंबईकरांना वाहतुकीचा खोळंबा सहन करावा लागणार आहे.
संभाव्य वाहतूक खोळंबा टळू शकेल
डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या कार्यप्रमुखांचा पोलीस व प्रशासकीय यंत्रणेत मोठ्या प्रमाणात लागेबांधे असल्याने सदर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर कारवाई करण्यात प्रशासकीय यंत्रणा धजावते. त्यामुळे, तेथील हरित पट्ट्यावर महापालिकेने कायमस्वरूपी वाहनतळ उभारले तर, स्टेडीयममध्ये येणार्या प्रेक्षकांची वाहने त्या वाहनतळावर (पार्किंग प्लाझा) शिस्तबद्ध उभी केली जावून, संभाव्य वाहतूक खोळंब्यावर नियंत्रण मिळवता येईल, असे नगरसेविका मीरा पाटील यांनी सांगितले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यास सहमती दर्शवली असल्याचे त्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारणसभेत बोलताना सांगितले.