नेरूळचे कैलास चव्हाण राज्यात दुसरे

0

नवी मुंबई : शासनाच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व आयआयटी, मुंबई यांच्या तर्फे गणित विषयासाठी घेण्यात आलेल्या मास्टर ट्रेनर्स परीक्षेत नेरूळ नवी मुंबई येथील कैलास चव्हाण यांनी लेखी परीक्षेत राज्यातून दुसरा येण्याचा मान पटकावला आहे. तर इतर मूल्यमापनासह राज्यात चौदावा क्रमांक त्यांनी मिळवला आहे. आयआयटी, मुंबई येथील व्हीएमसीसी मुख्य सभागृहात बुधवार दिक्षांत समारंभात प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.

या परीक्षेसाठी राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातील मिळून दोनशे चाळीस शिक्षक सहभागी झाले होते. त्यातील एकशे चौर्याहत्तर शिक्षक या दिक्षांत समारंभात उपस्थित होते. बारावी विज्ञान शाखेनंतर देण्यात येणार्या जेईई,एनईईटी परीक्षांना सामोरे जाण्यासाठी इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांप्रमाणे स्टेट बोर्डाचे विद्यार्थी गणित विषयात परिपक्व झाले पाहिजेत. गणितात त्यांचा पाया पक्का करून या परिक्षेविषयी मुलांची भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्यासाठी हे ट्रेनर्स निवडण्यात आले असल्याचे या प्रकल्पाचे शासकीय समन्वयक डॉ. श्रीनिवास शास्री यांनी सांगितले.या प्रसंगी आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. देवांग खक्कर, गणित विभागाचे डॉ. इंदर कुमार राणा, प्राध्यापक संतोष घारपुरे आदि मान्यवर, शिक्षक, त्यांचे नातेवाईक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.