नेरे आरोग्य केंद्राचे काम रखडले

0

भोर । पुणे जिल्हा परिषदेने नेरे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजूरी दिली असली तरी 2013 पासून या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम अपुर्णच आहे. हे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायतीच्या तीन खोल्यांमध्ये अडगळीत सुरु असून या आरोग्य केंद्रात कर्मचारी संख्याही मान्यते पेक्षा कमी असल्याने आरोग्य कर्मचार्‍यांवर आतिरिक्त कामाचा भार पडत असल्याने रुग्ण सेवेवर याचा विपरित परिणाम होत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नियुक्त केलेली रुग्ण समिती नावालाच असल्याचे समोर येत असून या प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयी सुविधांची वानवा असून जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रात्री प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला आरोग्य केंद्रात परिचारीकेद्वारे उपचार करण्यात आले. तर प्रसुतीत अडचणी येत असल्याने संबंधित रुग्ण महिलेला प्रसुतीसाठी भोर येथील जिल्हा उपरुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सकाळच्या सत्रातील कामावर असलेली दुसरी परिचारीका आरोग्य केंद्रावर हजरच झाली नसल्याने आरोग्य केंद्र कर्मचार्‍यांविना उघडे पडले असल्याची चर्चा गावांत रंगली होती. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कराळे व डॉ. संगिता भारती उपस्थित होते. याविषयाच्या अनुषंगाने चौकशी करुन दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे अश्वासन देण्यात आले.

या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकिय अधिकारी, दोन आरोग्य सहाय्यक, एक महिला आरोग्य सहाय्यीका, दोन परिचारीका, एक औषध निर्माता, एक लॅब टेक्निशियन, चार शिपाई, एक लेखनिक व एक चालक अशी मांजूर पदे आहेत. मात्र यात एक वैद्यकीय आधिकारी, एक परिचारीका, व दोन शिपायांची पदे रिक्त आहेत. असे असतानाही या प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील वर्षी 2016-17 मध्ये 2100 बाह्य रुग्णांना आरोग्य सेवा दिली गेली असून या महिन्यात 18 दिवसांत 15 महिलांची प्रसुती करण्यात आली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कराळे यांनी सांगितले.