कल्याण । कल्याण-नेवाळी विमानतळाच्या जागेचा प्रश्न अधिक चिघळले आहे. नेवाळी विमानतळासाठी सरकारने दडपशाहीने जमिनी संपादीत केल्याचे सांगत नेवाळी नाका परिसरात शेतकर्यांनी उग्र आंदोलन छेडले. टायर जाळून मलंगगडकडे जाणारा मुख्य रस्ता आंदोलकांनी रोखला आणि पोलिस व्हॅन जाळली. आपल्याच मालकीच्या शेतजमिनींवर पेरणी करण्यास मज्जाव केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे हे आंदोलन सुरू झाले आहे.
हक्काविषयी संभ्रम कायम
दुसर्या महायुद्धाच्या काळात मलंग रोडवरील नेवाळी येथील 1,600 एकर जागा ताब्यात घेतली होती. त्यातील काही जागा शेतकर्यांच्या ताब्यात असून, बर्याच जागेवर अतिक्रमण झाले आहे. या जागेवर संरक्षण विभागाचा हक्क आहे की, स्थानिक शेतकर्यांचा यावरून संभ्रम आहे. या जागेच्या मालकीबाबतची कोणतीही माहिती दिली जात नाही असा आक्षेप, ग्रामस्थ घेत आहेत.
आज दिल्लीत बैठक
पेटलेल्या आंदोलनाची आता केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना दखल घेतली आहे. दिल्लीत उद्या या संदर्भातील संबंधित विभागाची त्यांनी बैठक बोलावली आहे. शिवाय या प्रकरणाची सर्व माहिती त्यांनी मागवली आहे. सुभाष भामरे गुरूवारी धुळ्यात होते, आज ते दिल्लीत जाणार आहेत.
ब्रिटीशकाळात जमिन संपादन
1942 मध्ये ब्रिटिश सरकारने नेवाळी परिसरात संपादित केलेली एक हजार 650 एकर जागा आजपासच्या 18 गावांतील शेतकर्यांची आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतात 1942 सालच्या दुसर्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिश सैन्याने एक हजार 650 एकर जागा संपादित करून विमानतळ उभारले होते.
नौसेना बांधणार संरक्षक भिंत
ही जागा केंद्र सरकारने अजूनही शेतकर्यांना परत केलेली नाही. या जागेवर आता नौसेनेने ताबा घेतला आहे. तेथे संरक्षक भिंत उभारली जाणार आहे.
सरकारने संरक्षण खात्याला वर्ग केली
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने ही जागा शेतकर्यांना परत करणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने ही जागा संरक्षण खात्याकडे वर्ग केली. संरक्षण खात्याने ही जागा नौसेनेला दिली आहे.
…मग जागा कशासाठी
नेवाळी येथे विमानतळ होणार होते. मात्र, नियोजित विमानतळ नवी मुंबई येथे होत असल्याने आता नौसेनेला ही जागा कशासाठी हवी आहे, असा सवाल बाधित शेतकर्यांनी उपस्थित केला आहे.