नेवाळे प्रकरणाचा निकाल दोन टप्प्यात लावणार

0

मुंबई : नेवाळे जमीन प्रकरणाचा निकाल दोन टप्प्यात लावणार असून पहिल्या टप्प्यात संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेऊन केंद्र सरकारची वेळ घेऊन भेट निश्चित करण्यात येईल. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि ज्यांना या दरम्यान त्रास सहन करावा लागला आहे, अशी प्रकरणे मार्गी लावण्यात येतील. दुसर्‍या टप्प्यात केंद्र सरकारची वेळ घेऊन त्यांच्यासोबत बैठका करू, अशी माहिती सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय दत्त यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीची चर्चा करताना दिली.

नेवाळी प्रकरणी आंदोलन न करता शांततेने मार्ग काढावा
जमीन 1942 साली दुसर्‍या महायुद्धासाठी इंग्रजांनी बळकावली आणि ती जमीन 1945 साली ब्रिटीश सरकारने स्वतंत्र भारत सरकारकडे हस्तांतरीत केली होती. तेव्हापासून ती जमीन सरकारच्या नावावर आहे. या दरम्यान आधी ती जागा एअरफोर्स आणि आता भारतीय नौदल यांच्याकडे असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. मात्र या चर्चेदरम्यान आधी एअरफोर्स मग नौदल अशी जर जमीन हस्तांतरीत होत असेल आणि त्यांना ती नको असेल तर दावा केलेल्या शेतकर्‍यांना ती शेतीसाठीच द्यावी, असा मुद्दा चर्चेदरम्यान आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला. मात्र ही जागा केंद्राच्या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार असून राज्य सरकार केवळ त्यात एजन्सी म्हणून काम पाहत आहे. त्यामुळे त्यासंबंधित निर्णय केंद्रच घेऊ शकते, असे उत्तर सभागृह नेत्यांनी दिले. याचसोबत या चर्चेच्या निमित्ताने नेवाळे प्रकरणी आंदोलकांनी आंदोलन न करता सरकारशी चर्चा करून शांततेने मार्ग काढण्याचे आवाहनही त्यांनी केले.

डिफेंन्सचा नेमका कोणता प्रकल्प ?
संजय दत्त यांनी उपस्थित केलेल्या या लक्षवेधी चर्चेच्या दरम्यान हा प्रकल्प केंद्र सरकारकडून प्रस्तावित आहे, अशी माहिती राज्य सरकार देत आहे. मात्र नेमक्या कोणत्या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांकडून या जमिनी बळकावल्या जात आहेत, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी संजय दत्त यांनी या वेळी केली.

सरकारने जबरदस्ती करू नये
या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत किंवा यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघेपर्यंत येथील जमीन बळकावण्यासाठी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती सरकारकडून शेतकर्‍यांवर करण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांनी केली. यावर आपण नक्कीच संबंधित यंत्रणांना अश्या सूचना देण्यासाठी आजच प्रयत्न करू असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला दिले.