मुंबई । निवडणुकीत त्रास होऊ नये म्हणूनच एका पक्षाने जीएसटीमध्ये सुधारणा केल्या आहेत. त्यांच्या निर्णयाचा लोकांच्या हिताशी काहीही संबंध नाही. या पक्षासाठी आता ’नेशन फर्स्ट’ नाही, तर ’इलेक्शन फर्स्ट’ झाले आहे,’ असा टोला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्यात घाईघाईनं केलेल्या सुधारणांवरून आदित्य ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे. दोन दिवसापूर्वीही त्यांनी भाजपवर टीका केली होती. आता आदित्य यांच्या नव्या टीकेवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गुजरात निवडणुकीवरूनही केली होती टिका
गुजरात निवडणुकीच्या आधीही लोकांना जीएसटीचा त्रास होत होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता निवडणुकीत त्रास होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर लगेच जीएसटीमध्ये सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे या पक्षाचा ’नेशन फर्स्ट’चा मुखवटा फाटला आहे. त्यांच्यासाठी ’इलेक्शन फर्स्ट’ आहे, हे दिसून आले आहे, असे ट्विट आदित्य यांनी केले आहे. केंद्र सरकारने कररचनेत अ नेक बदल करत व्यापार्यांना काही सवलतीही जाहीर केल्या आहेत. हाच धागा पकडून आदित्य यांनी नाव न घेता भाजपवर टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वीही आदित्य यांनी ट्विटद्वारे भाजपला टोला हाणला होता. पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रिमंडळ गुजरात निवडणुकीच्या प्रचारात उतरलंय. मग देश कोण चालवतोय, असा सवाल त्यांनी केला होता. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी त्यास प्रत्युत्तरही दिले होते.