येरवडा । जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण विभाग (पुणे महानगरपालिका) आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील 19 वर्षांखालील मुलींच्या गटात नेसवाडिया महाविद्यालय, आर्मी पब्लिक स्कूल यांनी दुसर्या फेरीचा अडथळा पार केला.
येरवडा येथील डॉन बॉस्को हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील 19 वर्षांखालील मुलींच्या गटातील दुसर्या फेरीत नेसवाडिया महाविद्यालयाने सेंट मेरीज हायस्कूलचा टायब्रेकमध्ये 4-2 ने मात केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांकडून गोलशून्यची कोंडी काही फुटली नाही. त्यामुळे टायब्रेकचा अवलंब करण्यात आला. यात नेसवाडिया महाविद्यालयाकडून कशिश तहलियानी, रुद्राणी साखरे, संस्कृती दवे, विन्सेल डीसूझा यांनी गोल केले, तर सेंट मेरीजकडून केवळ रिया जोशी आणि अवनी श्रीवास्तव यांनाच गोल करता आले. खुशबू दौलतानी, विश्रुती रंजन यांनी संधी वाया घालवली.
दुसर्या लढतीत रेसकोर्सच्या आर्मी पब्लिक स्कूलने डॉन बॉस्को हायस्कूलवर 4-0 ने मात केली. पहिल्या फेरीत आर्मी पब्लिक स्कूलने एस. पी. महाविद्यालयावर 1-0 ने मात केली. यात लढतीच्या सहाव्या मिनिटाला पूजा भांडगरने गोल करून आर्मी स्कूलला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून आर्मी स्कूलने विजय मिळवला. तर सेंट मेरीज हायस्कूलने नौरोसजी वाडिया महाविद्यालयावर 1-0 ने मात केली. पण नौरोसजी महाविद्यालयाला शेवटपर्यंत बरोबरी साधण्यात अपयश आले.