नेहता गावाजवळील तापी पात्रात गावठी दारूच्या तीन भट्ट्या उद्ध्वस्त

0

रावेर : तालुक्यातील नेहता गाव शिवारातील तापी नदीच्या पात्रात बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर रावरे पोलिसांनी या भट्ट्या उद्ध्वस्त केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
तालुक्यातील नेहते गाव शिवारातील तापी नदीच्या पात्रात बेकायदेशीर दारू तयार करून विक्री होत असल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी यांना मिळाल्यानंतर रावेर पोलिसांनी धाड टाकत संशयित आरोपी कैला पाव्हन तायडे (रा.नेहता) याच्या ताब्यातून सहा हजार रुपये किंमतीचे गावठी दारू बनवण्याचे रसायन तसेच 15 लीटर गावठी दारू जप्त केली. दुसर्‍या कारवाई संशयीत आरोपी सूपडू भिवसन तायडे (रा.नेहता) याच्याविरुद्ध करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून आठ हजार 500 रूपयांचे कच्चे रसायन, 15 लिटर मापाचे 17 प्लॉस्टिक कॅन दारू नष्ट करण्यात आली तसेच तर तिसर्‍या घटनेत संजय नामदेव तायडे (रा.नेहता) यांच्याकडे सात हजार 500 रूपये किंमतीची दारू आढळून आली. तिघांकडील कच्चे रसायन आणि दारू पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शरीफ तडवी, हवालदार जितेंद्र नारेकर, महेंद्र सुरवाडे, भरत सोपे, सुरेश मेढे, तुषार मोरे, मनोज मस्के यांच्या पथकामार्फत नष्ट करण्यात आले.

विनाकारण फिरणार्‍या सहा जणांवर कारवाई
रावेर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी सुरू असतानाच विनाकारण दुचाकीवर फिरणार्‍या सहा जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करीत वाहने जप्त केली. आतापर्यंत पोलिसांनी अशा पद्धत्तीने 21 गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.