कर्मचार्यांचा हाताला मिळाला आराम
पिंपरी चिंचवड : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) च्या नेहरुनगर आगारात यंत्र क्रांती’ झाल्याने कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बसेस धुण्यासाठी आता यांत्रिक पद्धतीचा अवलंब केला जात असल्याने गेली अनेक वर्षे राबविणार्या हातांना आराम मिळाला आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपी अनेक समस्यांनी ग्रासलेली असताना स्वच्छतेच्या बाबतीत तरी पीएमपी प्रशासनाला दिलासा मिळत आहे. पिंपरीचे नेहरुनगर येथील पीएमपी आगार ब्रेकडाऊन, नादुरुस्त गाड्या यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गाड्या स्वच्छ नसल्यामुळे अनेक प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेत पीएमपी प्रशासनाने गाड्यांची सफाई करण्यासाठी नेहरुनगर आगारात वॉशिंग मशीन’ बसविले आहे. यामुळे आगारातील सर्वच गाड्यांची कमी वेळात चांगल्याप्रकारे स्वच्छता होत आहे. तसेच पाण्याची बचत होत आहे.
पीएमपीएमएल प्रशासनाने आत्तापर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात 4 आगारात या मशीन बसविण्यात आल्या आहेत. पुण्यात स्वारगेट, कोथरुड, शिवाजीनगर, येथील तर पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरीच्या नेहरुनगर आगारात ही मशीन बसवण्यात आली आहे. यामुळे आगारातील कर्मचार्यांचा श्रम, पाणी, वेळ याची बचत झाल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली आहे. मशीन नव्हती तेव्हा सफाई कामगारांना एक गाडी साफ करायला 40 ते 45 मिनिटं वेळ लागत होता. तर दोनशे लीटर पाणी एका बसच्या स्वच्छतेसाठी लागत होते. आता 50 ते 60 लीटर पाण्यात चांगल्याप्रकारे बस स्वच्छ होते. तर 5 मिनिटांत एक गाडी स्वच्छ होत आहे. यामुळे आगारातील कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमपी प्रशासनाने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये एकूण 13 मशीन देण्याचे नियोजन आहे. मात्र सध्या 4 आगारांना मशीनचे वितरण करण्यात आले असून येत्या काळात नियोजित आगारांना या मशीन मिळणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
पूर्वी 10 ते 15 बस दिवसाला स्वच्छ केल्या जात होत्या. मात्र आता वॉशिंग मशीन’ आल्यापासून दररोज 40 ते 45 बस साफ केल्या जात आहेत. यामुळे पूर्वी प्रवाशांच्या स्वच्छतेबाबतच्या ज्या तक्रारी येत होत्या, त्या आता बंद झाल्या आहेत. तर कामगारांचे श्रम तसेच पाणी, वेळ वाचत आहे.
राजेश रुपनवर, पीएमपी नेहरुनगर आगार प्रमुख.