नेहरूंमुळेच एक चहावाला पंतप्रधान-शशी थरूर

0

नवी दिल्ली – काँग्रेस नेते शशी थरूर हे वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. थरूर पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचे देशाच्या विकासातील योगदान या विषयावर बोलत असताना नेहरुंमुळे एक चहावाला पंतप्रधान झाला असे वक्तव्य शशी थरूर यांनी केले आहे. थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता टीका केली आहे. नेहरुंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला एका जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. थरूर यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेहरुंच्या जीवनावरील ‘नेहरु : द इन्व्हेन्शन’ या थरूर यांनी लिहीलेल्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात थरूर यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली. आपल्या देशाला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभू शकतो, ते केवळ नेहरुंमुळे शक्य झाले आहे. नेहरुंनी निर्माण केलेल्या संस्थात्मक धोरणांमुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला सर्वोच्च पदावर पोहोचण्याची इच्छाशक्ती निर्माण होते असे थरूर यांनी सांगितले. त्यामुळे नेहरु भारतमातेचे एक महान पुत्र असताना त्यांच्यावर इंटरनेटवरुन चिखलफेक करणारे लिखान केले जाते. त्यांच्या संस्थात्मक रचनांच्या उभारणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले जाते, असा सवालही थरूर यांनी केला.

मंगलयानाच्या माध्यमातून भारत मंगळावर पोहोचण्याचे स्वप्न पाहत आहे. मात्र, या अवकाश संसोधन संस्थेची अर्थात इस्रोची स्थापना नेहरुंनीच केली. गरीब भारतीयांना अवकाशातील मोठी स्वप्ने पहायची त्यांनी ठरवले. नेहरुंनी आयआयटी सारख्या दर्जेदार संस्थांची निर्मिती केली. या माध्यमातून अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये 40 टक्के भारतीय तरुण काम करीत आहेत संयुक्त लोकशाही आणि भारतीय राजकारणातील राजकीय महत्त्व ही नेहरुंचीच देणगी असल्याचंही थरूर यांनी कार्यक्रमात म्हटलं आहे.