मुंबई : विज्ञान लेखक ए. पी. जयरामन यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त नेहरू विज्ञान केंद्रात विज्ञान कथा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ विज्ञान लेखक एस. शिवदास, डॉ. ए. पी. जयरामन, उषा व्यंकटरमण, ज्योती रामचंद्रन, ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ विज्ञान लेखक एस. शिवदास म्हणाले की, पाठ्यपुस्तकातील शिक्षण हे शिकविलेच पाहिजे, पण ते शिकवत असताना गोष्टीच्या स्वरुपात शिकविले गेले तर ते विद्यार्थ्यांना भावते व विषय त्यांच्या लक्षात राहतो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण करून त्याचे गोष्टीत रुपांतर करून विद्यार्थ्यांना शिकवावे. यासाठी प्रत्येक शिक्षकाने गोष्ट तयार करणे आणि ती सांगणे आवश्यक आहे, असे शिवदास म्हणाले.
या महोत्सवात मुंबईसह राज्यातील विविध भागातील विज्ञान शिक्षक सहभागी झाले होते. त्यातील काही शिक्षकांनी त्यांनी लिहिलेल्या कथा सादर केल्या, तर काहींनी कथा लिहिण्याच्या वेगवेगळ्या कौशल्यावर भाष्य केले. उषा व्यंकटरमण यांनी कल्पनेच्या विश्वात नेऊन विज्ञानाचे शिक्षण कसे दिले जाऊ शकते याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी रचलेल्या विज्ञान कवितांनी प्रेक्षागृह विज्ञानमय झाले. त्यांच्या कथा सादरीकरणाच्या कौशल्याने सारेच भारावून गेले. ज्योती रामचंद्रन यांनी कथा सादरीकरण करताना माणसाच्या मेंदूवर कोणता व कसा परिणाम होतो याचे सादरीकरण केले.