नेहरू व इंदिरा गांधीतला पत्रव्यवहार विधानभवनात येऊ द्या

0

मुंबई | पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या कन्या इंदिरा गांधी यांच्या पिता- मुलीच्या नातेसंबंधांकडे सहसा कोण लक्ष देत नाही. आपली आई, कमला नेहरू यांच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधींनी आपल्या वडिलांना कसा धीर दिला, हे सर्वांना समजले पाहिजे. यासाठी या दोघांमधला पत्रव्यवहार एकत्रित करून तो पुस्तक रूपात विधानभवनाच्या वाचनालयात ठेवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी गुरूवारी विधान परिषदेत केले.

आज सकाळी विशेष बैठकीत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या गौरवाच्या प्रस्तावावर पुढची चर्चा सुरू झाली. त्यावेळी ते बोलत होते. इंदिरा गांधी यांच्या अटकेनंतर या देशात काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले. इंग्रजांच्या काळानंतर देशात झालेले हेच सर्वात मोठे जेलभरो आंदोलन होते, असेही ते म्हणाले.

.. आणि मुंबई महाराष्ट्राला मिळाली
स्वातंत्र्यांनंतर देशाच्या राजकारणात इंदिरा गांधी खऱ्या अर्थानं सक्रीय झाल्या. १९५९ मध्ये त्या काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. भाषावार प्रांतरचना केली जात होती. काही गुजराती नेते यावेळी मुंबईला गुजरातमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करत होते. दिल्लीतल्या राज्यकर्त्यांना तशी माहिती दिली जात होती. अशा वेळीच नाशिकला आलेल्या इंदिरा गांधी यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीची माहिती मिळाली. एस. एम. जोशी, कॉ. श्रीपाद डांगे, प्रबोधनकार ठाकरे यासाठी कसे काम करतात हे समजले. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यकडे मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी यशस्वी शिष्टाई केली, असे शरद रणपिसे म्हणाले.

हा योगोयोगच
काय योगायोग आहे. आज ज्या विधिमंडळाच्या इमारतीत आपण चर्चा करत आहोत, त्या इमारतीचे १९ एप्रिल १९८१ रोजी इंदिरा गांधी यांनी उदघाटन केले होते. याच वास्तूमध्ये त्यांचा कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव येणे सुखद आहे, असे हेमंत टकले यांनी यावेळी सांगितले. इंदिराजींचा सेक्युलर वाद हा पंडित नेहरूंपेक्षा वेगळा होता. त्या आपल्या भाषणात सेक्युलरसोबतच सर्व धर्म समभावचा उल्लेख करत होत्या. सेक्युलर म्हणजे निधर्मी नव्हे, असे त्या म्हणत, असेही ते म्हणाले.

पाठीवर अभिनंदनाची थाप
मी अमेरिका सोडून भारतात परतलो. त्यानंतर माझ्या वडिलांनी मला इंदिराजींच्या समोर उभे केले. तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारून माझे अभिनंदन केले. भारतात कायमचे परतल्याबद्दल. हे त्यांचे देशप्रेम. माझ्या बहिणीच्या लग्नाला इंदिरांजींचे सगळे कुटूंब होते. दुसऱ्या दिवशी त्यांचे दोन रक्षक घरी आले. त्यांनी आईला बोलावले. इंदिराजींना दिलेले ते पांढरे लाडू कसले होते, असे त्यांनी विचारले. आई घाबरली. वडिलांना बोलावले. नंतर कळले की त्यांना दिलेले राजगिऱ्याचे लाडू इंदिराजींना आवडले होते. हे त्यांचे महाराष्ट्र प्रेम आहे, असेही त्यांनी सांगितले.

व्यंगचित्रातूनच श्रद्धांजली
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी इंदिरा गांधी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातल्या संबंधावर प्रकाश टाकला. या दोन्ही नेत्यांमध्ये टिकेचे नाते होते. मात्र, व्यंगचित्रांच्या माध्यमातून बाळासाहेबांनी इंदिराजींच्या चांगल्या कार्याचे कौतुकही केले. १९८४ साली इंदिराजी गांधीं यांची हत्त्या झाली. त्यानंतर विझलेला दीप व त्याच्या काजळी व धूरातून इंदिराजीचे चित्र साकारून बाळासाहेबांनी लिहीले होते 'शब्दांची गरज नाही, देश अंधारला, इंदिराजी गेल्या'. अशी बोलकी श्रद्धांजली त्यांनी वाहिली, असेही त्या म्हणाल्या.

असे धाडस दुर्मिळच
काँग्रेसमधल्या अनेकांचा विरोध झुगारून इंदिरा गांधी यांनी अध्यादेश काढून १४ बँकेचे राष्ट्रीयीकरण केले. सर्वोच्च न्यायालयाने हा अध्यादेश घटनाबाह्य ठरवला. त्यानंतर काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्यांनी हा विषय मांडला आणि निवडून सत्तेवर आल्यानंतर इंदिराजींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. ११ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हा विषय गेला. तेव्हा लोकशाहीत लोकांची इच्छा अंतीम असते हे सरकारी वकिलांनी पटवून दिले आणि इंदिराजींच्या बाजूने निकाल लागला. अशी जिद्द, धाडस फार दुर्मिळ असते, अशा शब्दांत जनार्दन चांदुरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नेमप्लेट बदलल्याने नाव जात नाही
जनता पार्टीच्या राजवटीत कारागृहात राहिलेल्या इंदिरा गांधी सुटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नंदुरबारला आल्या. इथल्या आश्रमशाळेत त्यांनी जेवण घेतले. आजही तिथे त्यांचा फोटो पूजला जातो. नंदुरबारमधले आदिवासी आजही इंदिराजींना देवाची उपमा देतात. दुर्दैवाने त्यांच्या नावेनं चालू असलेल्या योजनांची नावे बदलण्याचे काम हे सरकार करत आहे. पण, नेमप्लेट बदलल्याने त्यांचे नाव जाणार नाही. ते आमच्या हृदयात आहे, असे चंद्रकांत रघुवंशी म्हणाले.

काँग्रेसला कानपिचक्या
नारायण राणे यांनी आपल्या भाषणात काँग्रेसलाही कानपिचक्या दिल्या. आणिबाणीनंतर जनतेने इंदिराजींना नाकारले. पण, अपयशाने त्या खचल्या नाहीत. अपयशाने खचू नका आणि शाने हुरळून जाऊ नका, असे त्या म्हणायच्या. त्यांचे हे वाक्य आजही लागू पडते. पराभवानंतर त्या पवनारमध्ये विनोबा भावेंच्या आश्रमात गेल्या होत्या. तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले की, इतनी बडी पार्टी, कैसे हार गई? तेव्हा त्या उसळून म्हणाल्या की, हारे तो क्या हुआ, फिर जितेंगे. घर नही बैठेंगे, जसे आता बसले आहेत.. असे ते म्हणाले.

असे असावे स्वावलंबन
माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी इंदिरा गांधी यांच्या स्वावलंबनाची माहिती दिली. हेलिकॉप्टरमधलं पेट्रोल संपल्यामुळे प्रत्येक सभेला त्यांना उशीर होत गेला. कोल्हापूरची सभा ११ तास उशिरा झाली. पहाटे अडीच वाजता सांगली आणि नंतर साडेचार वाजता पंढरपूरची सभा झाली. तेव्हा लक्षात आले की इंदिराजींची बॅग हेलिकॉप्टरमध्येच राहिली. कार्यकर्त्यांची धावाधाव झाली. इकडून तिकडून ५० साड्या गोळा करण्यात आल्या आणि त्या साड्यांची बॅग घेऊन कार्यकर्ते इंदिरांजीकडे गेले. तेव्हढ्यात इंदिराजी फ्रेश होऊन बाहेर आल्या. नेसलेली साडी स्वतः धुऊन, वाळवून त्यांनी परिधान केली होती. माणसाने किती स्वावलंबी असावे याचे हे उदाहरण आहे, असे ते म्हणाले.

माणुसकीचा ओलावा
काही कारणांवरून इंदिराजींचे यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर मतभेद झाले होते. त्यानंतर सभागृहात यशवंतराव शेवटच्या ओळीतल्या बाकावर बसले होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना पाहिले आणि स्वतः जाऊन त्यांनी यशवंतरावांना पहिल्या रांगेत आणून बसवले. कटुता असली तरी माणुसकीचा ओलावा त्यांनी कमी होऊ दिला नाही, असे सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जोगेंद्र कवाडे, विद्या चव्हाण, आनंद पाटील, सुभाष झांबड, प्रकाश गजभिये, हुस्नबानू खलिफे, रामहरी रूपनवर, डॉ. सुधीर तांबे आदींनी या प्रस्तावावर भाष्य केले. त्यानंतर हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला.