नेहाच्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील

0

जेजुरी । छेडछाडीला कंटाळून पुरंदर तालुक्याच्या बेलसर येथील कदमवस्तीतील नेहा संतोष कदम या तरुणीने आत्महत्या केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी तिच्या मातापित्याचे सांत्वन केले. तसेच पोलिस तपासाची माहिती घेतली. हा खटला द्रुतगतीने चालवून यातील आरोपींना कठोर शासन होईल, असे शासन स्तरावरून प्रयत्न करण्याचे आश्‍वासन खासदार सुळे यांनी यावेळी दिले.

छेडछाडीला कंटाळून आत्महत्या
कदम वस्तीवरील नेहा संतोष कदम ही जेजुरीतील एका महाविद्यालयात अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. घरामधून महाविद्यालयात जाताना गरुडवस्तीवरील किरण एकनाथ गरुड व राकेश भाऊसाहेब गरुड हे दोघेजण तिला जाता-येता छेडछाड, अश्‍लील चाळे करीत त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून तिने 15 नोव्हेंबर रोजी पिकावर फवारणी करण्याचे विषारी औषध प्राशन केले होते. उपचार घेत असताना 21 नोव्हेंबरला तिचा मृत्यू झाला होता. मात्र, तत्पूर्वीच पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींची येरवड्याला रवानगी केली होती. या घटनेने तालुक्यातील विद्यालये, महाविद्यालयांमध्ये खळबळ माजली आहे.

युवक-युवतींना समुपदेशन
सुळे यांच्यासमवेत माजी जिल्हा परिषद सभापती सारीका इंगळे-वाडेकर, तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा गौरी कुंजीर उपस्थित होत्या. यावेळी सुळे यांनी पोलिस उपनिरीक्षक राजेश माळेगावे यांच्याशी चर्चा करीत तपासाची माहिती घेतली. सध्या शाळा, महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक-कर्मचारी, युवक-युवतींशी संवाद साधण्यात येऊन समुपदेशन करण्याची मोहीम सुरू आहे, अशी माहिती उपनिरीक्षक राजेश माळेगावे यांनी दिली. तर हा खटला द्रुतगतीने चालवून यातील आरोपींना कठोर शासन होईल यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न केले जातील. तसेच शाळा-महाविद्यालयांमधून राष्ट्रवादीकडून युवतींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपाय योजना राबविण्याचे धोरण अंमलात आणणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.