नवी दिल्ली : काँग्रेसकडून नोटाबंदीच्या वर्षपूर्तीचा हा दिवस काळा दिवस पाळण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी अहमदाबादमध्ये सरकारवर टीकेची तोफ डागली. या टीकेला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. जेटली म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय हा नैतिक आणि तार्किकदृष्ट्या योग्य होता. संघटित लूट तर काँग्रेसच्या काळात टुजी, कॉमनवेल्थ घोटाळा आणि कोळसा घोटाळ्याच्या रूपाने पाहायला मिळाली. त्यामुळे मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करण्यापेक्षा 2014 पूर्वीची आणि नंतरची भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक विश्वासर्हता पडताळून पाहावी.
अर्थव्यवस्थेत कमी पैसा असेल तर भ्रष्टाचार कमी असतो, असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. मात्र, त्यामुळे करचुकवेगिरी अवघड होऊन बसेल. काँग्रेसच्या काळात संपूर्ण व्यवस्था एकाच घराण्यासाठी काम करायची. मात्र, भाजपसाठी लोकसेवा हे प्रमुख उद्दिष्ट आहे. याशिवाय, युपीए सरकारचा कार्यकाळ हा धोरण लकव्यामुळे गाजला. तर रालोआ सरकारच्या काळात अनेक धोरणात्मक सुधारणा राबवण्यात आल्या, असा दावा यावेळी जेटलींनी केला.