हडपसर । नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून एका उच्च शिक्षीत 33 वर्षीय तरुणाने लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी रास्ता पेठेत हा प्रकार घडला. दरम्यान तरुणाने मृत्यूपूर्वी लिहीलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. मनोज शिवाजी भोसले असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नोकरी मिळत नसल्याने नैराश्यात
मनोज हा हडपसर परिसरात राहण्यास आहे. त्याचे एमएससी एमऐडपर्यंत शिक्षण झाले आहे. मात्र, त्याला नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो नैराश्यात होता. दरम्यान तो गुरुवारी रात्री रास्ता पेठेतील लॉजमध्ये राहण्यास आला होता. शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्याने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. लॉजमधील कामगारांनी हा प्रकार पाहिला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहीली असून, त्यात नोकरी मिळत नसल्याने मी काहीच करू शकत नाही. आयुष्याला कंटाळलो आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास समर्थ पोलिस करत आहेत.