भोसरीतील प्रभाग सदस्यांची महापौरांकडे मागणी
पिंपरी चिंचवड : शहराला सध्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा वापरावर प्रशासनाने भर द्यावा, अशी मागणी भोसरीतील प्रभाग स्वीकृत सदस्यांनी केली आहे. स्वीकृत सदस्य दिनेश यादव, सागर हिंगणे, संतोष मोरे, गोपीकृष्ण धावडे यांनी यासंदर्भात महापौर राहुल जाधव यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले आहे.
हे देखील वाचा
नागरिकांना उद्युक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा…
त्यात म्हटले आहे, शहराला सध्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहरात पाण्याचे अनेक नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध आहेत. विहीर, हातपंप व अन्य नैसर्गिक स्त्रोतांचा वापर वाढल्यास धरणातील पाण्याचा वापर काही प्रमाणात कमी होईल. त्यातून पाणी टंचाईवर थोड्या प्रमाणात का होईना मात करता येईल. परंतु, नैसर्गिक स्त्रोतांचा नागरिकांनी वापर करावा, यासाठी महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही, हे मोठे दुर्दैव आहे. त्यामुळे या ज्वलंत प्रश्नांवर प्रशासनातील अधिकार्यांना जागे करण्याचे काम करावे. पाण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करावा, यासाठी नागरिकांना उद्युक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही निवेदनात नमूद आहे.