नॉटआउट ’100’

0

इस्रोने शंभरावा उपग्रह अंतराळात सोडला

श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने शुक्रवारी आणखी एक नवा इतिहास रचला. पीएसएलव्ही-सी 40 या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने इस्रोने आपला ’100’ व्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. याच बरोबर अन्य देशांचे आणखी 30 उपग्रहांचेदेखील इस्रोने यशस्वी प्रक्षेपण केले असून, त्यांना योग्य त्या कक्षेमध्ये स्थापन केले आहे. सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनी ‘पीएसएलव्ही सी- 40’ हे प्रक्षेपक 31 उपग्रहांसह अवकाशात झेपावले आणि या मोहीमेची इस्रोच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली. 31 उपग्रहांमध्ये भारताच्या तीन उपग्रहांचा समावेश आहे. अंतराळातील भारताचा डोळा म्हणून या उपग्रहाकडे बघितले जाते. पृथ्वीवरच्या घडामोडींकडे लक्ष ठेवण्यासाठी हे उपग्रह महत्त्वाचे आहे. याशिवाय फ्रान्स, फिनलॅण्ड, कॅनडा, अमेरिका, दक्षिण कोरिया, युरोप या देशांचे उपग्रहदेखील अवकाशात सोडण्यात आले. अमेरिकेचे सर्वाधिक 19 तर दक्षिण कोरियाचे 5 उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. तर फिनलॅण्ड, कॅनडा आदी देशांच्या प्रत्येकी एका उपग्रहाचा यात समावेश आहे. ‘पीएसएलव्ही सी- 40’ या प्रक्षेपकाचे 42 वे उड्डाण होते.

पंतप्रधानांसह सर्वांकडून शास्त्रज्ञांचे अभिनंदन
भारताने स्वत:चा एक 100 किलोचा मायक्रो आणि एक 10 किलोचा नॅनो उपग्रह आंतराळात सोडला आहे. याशिवाय, भारताचा सर्वात मोठा उपग्रह आहे तो म्हणजे कार्टोसॅट 2 सीरिज उपग्रह. हा उपग्रह 710 किलोग्रॅमचा असून, कार्टोसॅट 2 हा उपग्रह म्हणजे भारताचा ‘आकाशातील डोळा’ म्हणून ओळखला जात आहे. आकाशातून पृथ्वीचे फोटो घेण्याची क्षमता या उपग्रहात आहे. भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम सीमांवर शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी हे महत्त्वाचे काम करणार आहे. हा उपग्रह पृथ्वीची अवलोकन करणारी उच्च दर्जाची छायाचित्र पाठवणार आहे. प्रक्षेपणानंतर थोड्याच वेळात कार्टोसॅट-2 ला त्याच्या योग्य कक्षेमध्ये प्रस्थापित करण्यात आले. इस्रोच्या या यशानंतर या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व शास्त्रज्ञांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच इस्रोच्या या कामगिरीमुळे देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील इस्रोचे या कामगिरीसाठी कौतुक केले असून, वर्षाच्या सुरुवातीला देशाला मिळालेले हे यश अत्यंत महत्तवाचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

लवकरच चांद्रयान-2 मोहीम
इस्त्रोचे संचालक एम. अन्नादुराई यांनी सांगितल्यानुसार, लवकरच चांद्रयान-2 मोहीम हाती घेतली जाणार आहे. पहिल्या सहामाहीत ही मोहीम सुरु होईल. या मिशनसोबत ऑर्बिटर आणि लँडर देखील पाठवले जातील. यांचे इंटीग्रेशन आणि टेस्टिंग शेवटच्या टप्प्यात आहे, असेही ते म्हणाले. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये इस्रोला अपयशाचा सामना करावा लागला होता. दिशादर्शक उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने इस्रोची मोहीम फत्ते होऊ शकली नव्हती. त्यानंतर इस्रोची ही पहिलीच मोहीम होती. 2018 मधील ही पहिली मोहीम यशस्वी झाल्याने ‘इस्रो’वर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. इस्रोने 1999 पासून व्यावसायिक शाखेच्या मदतीने परदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. 2016 मध्ये इस्रोने इतर देशांचे 22 उपग्रह प्रक्षेपित केले होते. मार्च 2017 मध्ये इस्रोने एकाचवेळी 7 देशांचे 104 उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा विक्रम मोडीत काढला होता. याआधी रशियाने एकाचवेळी 37 उपग्रह अवकाशात सोडण्याची किमया साधली होती.

कुणाचे किती उपग्रह सोडले
– 19 : अमेरिका
– 05 : दक्षिण कोरिया
– 01 : प्रत्येकी कॅनडा, फ्रान्स, ब्रिटन, फिनलॅण्ड