नवी दिल्ली : वारंवार नोटाबंदीचा मुद्दा उठवणार्या विरोधकांचा संसदेत भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी समाचार घेतला. फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्राडॅमसने भारताला नव्या उंचीवर घेऊन जाणार्या ज्या व्यक्तीबद्दल नोंद केली होती, ती व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे वक्तव्य भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी संसदेत केले.
लोकसभेत पूरक मागण्यांवर बोलताना त्यांनी नॉस्ट्राडॅमसने वर्तवलेल्या भविष्यवाणीचा उल्लेेख केला. पूर्व भागात असा एक नेता होईल जो भारताला एका नव्या उंचीवर नेईल, तो नेता म्हणजे पंतप्रधान मोदी, असे सोमय्या यांनी म्हटले. 16 व्या शतकातील प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्राडॅमस यांनी हजारो ऐतिहासिक घटनांबाबत आधीच भविष्यवाणी केलेली आहे, असे सांगत खासदार सोमय्या म्हणाले, यामध्ये हिटलरचा उदय आणि 2001मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त होण्यासारख्या घटनांचाही समावेश आहे, असे संदर्भही यावेळी जोडले. भाजप नेत्यांकडून नॉस्ट्राडॅमसच्या भविष्यवाणीचा आधार घेत नरेंद्र मोदींचे कौतुक करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनीही आपल्या फेसबुक पेजवर अशा पद्धतीची टिपणी केली होती. नॉस्ट्राडॅमसने भारताला एका नव्या उंचीवर घेऊन जाणार्या नेत्याबाबत भविष्यवाणी केली होती, ते नरेंद्र मोदीच असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.