नोंदणीधारक मतदारांना विमा संरक्षण 

0
मुख्याधिकारी आवारे यांनी दिली माहिती
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदे मार्फत नगरपालिका हद्दीतील नोंदणीधारक मतदारांचा श्री डोळसनाथ महाराज विमा संरक्षण योजनेमध्ये समावेश केला असल्याची माहिती तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी दिली. या योजनेमध्ये 18 ते 75 वय असलेल्या मतदारांचा समावेश केला आहे. या विमा योजनेची सुरुवात ऑक्टोबर 2018 पासून केली असून ‘नॅशनल इन्शुरन्स कंपनी’ कोपरगाव, अहमदनगर या कंपनीकडे सर्व तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील मतदारांची नोंद केली आहे. यासाठी सन 2014 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.
अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रूपये
योजनेबद्दल माहिती देतना आवारे पुढे म्हणाले की, या योजनेमध्ये अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रूपये, अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये (कायमचे अपंगत्व आल्यास घटना घडल्यापासून एक वर्षाच्या आत), अपघातामुळे दोन अवयव-हात, पाय, डोळे कायमचे निकामी झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे एक अवयव निकामी झाल्यास 1 लाख रुपये अश्या प्रकारे मोबदला त्या व्यक्तीस किंवा त्याचे वारसदारांना मिळणार आहे. ज्या नागरिकांची मतदार यादीमध्ये नोंदणी झाली नाही परंतु नगर परिषदेचे रहिवासी आहेत त्यांनी मतदार नोदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील या श्री डोळसनाथ महाराज विमा संरक्षण यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात येईल, असेही आवारे यांनी सांगितले. दु:खद घटने नंतर या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी मृत्यूचा दाखला, एफआयआर, वारस दाखला, घटना स्थळाचा पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन दाखला, मतदान कार्ड, क्लेम फॉर्म, वारसाचे प्रतिज्ञापत्र, मतदार यादीची झेरॉक्स आदी कागदपत्र सह तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील दीनदयाळ अन्तोदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या विभाग प्रमुख विभा वाणी यांच्याकडे संपर्क करावा.