33 हजार शेतकऱ्यांचा उडीद हमीभावाने खरेदी होणार
मुंबई (निलेश झालटे):- सरकारकडे नोंदणी करूनही खरेदी न झालेल्या उडीदाची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सरकारच्या हमीभाव केंद्रावर 32 हजार 240 शेतकऱ्यांची नोंदणी केलेली होती. मात्र केंद्र सरकारने खरेदीचा दिलेला लक्षांक पूर्ण झाल्यामुळे या शेतकऱ्यांचा उडीद खरेदी झालेला नव्हता. केंद्र सरकारने हमी भावाने खरेदी करण्याची तारीख वाढवून दिली होती मात्र लक्षांक पूर्ण झालेला असल्यामुळे 32 हजार शेतकऱ्यांच्या उडीदाची खरेदीच झालेली नाही. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या उडीद खरेदीच्या संदर्भात उडीद खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 लाख क्विंटल उडीद हमीभावाने खरेदी करण्याची परवानगी केंद्र सरकारला मागितलेली आहे. केंद्र सरकारची परवानगी येण्याची वाट न पाहता राज्य सरकारकडूनच खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जरी केंद्र सरकारने वाढीव खऱेदीला परवानगी दिली नाही तरी राज्य सरकार शेतकऱ्यांना हमीभावाने पैसे देणार आहे.
राज्य शासनाने हमीभावाने उडीद उडीदाची खरेदी केली आहे. 5400 रूपये प्रतिक्विंटल या हमीभावाने ही खरेदी झाली. राज्यातील एकूण 23 जिल्ह्यातील 118 केंद्रावर 5 लाख 20 हजार 288 क्विंटल उडीदाची खरेदी झाली होती. यामध्ये एकूण 17741 शेतकऱ्यांचा उडीद हमीभावाने खरेदी करण्यात आला. मात्र हमीभावाने खरेदी करत असतांना 32 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करून देखील त्यांचा उडीद खरेदी होऊ शकला नाही. खरेदीच्या आगोदर हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नांवे नोंदणी करावेत असे आवाहन केले होते. खरेदी केंद्रावर अधिकृत नोंदणी केलेल्या आणखी 32240 शेतकऱ्यांची नोंदणी झालेली होती मात्र त्यांचा उडीद खरेदी झाला नव्हता. या निर्णयामुळे या शेतकऱ्यांच्या उडीदाची खरेदी होणार आहे. उडीदाबरोबरच नोंदणी झालेल्या सोयाबिन आणि मुगाची देखील खरेदी केली जाणार असल्याची माहिती विभागाकडून मिळाली आहे.
केंद्र सरकारने उडीद खरेदी करत असतांना 5 लाख 20 हजार क्विंटल उडीद खरेदी करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी शिल्लक राहिले होते. मात्र आता राज्य सरकारने या 32 हजार शेतकऱ्यांचा देखील उडीद खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडे खरेदीची परवानगी मागितली आहे. केंद्र सरकारकडून ती लवकरच मिळेल . शेतकऱ्याच्या हितासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून पैसे देण्यात येतील.
-सुभाष देशमुख,
सहकार व पणन मंत्री, महाराष्ट्र
केंद्र सरकारने तारीख वाढवून दिली आहे मात्र लक्षांक वाढवून दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा उडीद खरेदी होऊ शकला नव्हता. त्यामुळे सरकारने स्वतःच्या पातळीवरच उडीद खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार कायमच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. 32 हजार शेतकऱ्यांचा उडीद शिल्लक राहिलेला आहे. या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे लाभ होणार आहे.
– सदाभाऊ खोत,
राज्यमंत्री, कृषी व पणन