नोकरीऐवजी उद्योग निवडल्यास देशात होईल रोजगार निर्मिती

0

रामदास माने ; श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीत व्याख्यान

भुसावळ- तरुणांना नोकरी व उद्योग यापैकी एक निवडायचे असेल तर त्यांनी उद्योगाची निवड करावी कारण आज देशाला तरुण उद्योजकांची गरज आहे. तसे झाल्यास उद्योगधंद्याच्या वाढीबरोबरच रोजगार निर्मिती होईल आणि देशाची आर्थिक प्रगती होईल. विद्यार्थी दशेपासूनच यशस्वी उद्योजक होण्याचा ध्यास घेऊन प्रयत्न केले पाहिजेत. उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी वित्तीय संस्था, बँका, शासनाचे नियम व अटी, यासाठी लागणारे मनुष्यबळ, उत्पादीत वस्तूची मागणी, विक्री पश्चात सेवा आणि स्पर्धेत टिकण्याची तयारी याबाबत सूक्ष्म नियोजन आवश्यक असल्याचे मार्गदर्शन ज्येष्ठ उद्योजक रामदास माने यांनी येथे केले. भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुवारी ‘गाडगेबाबा व्याख्यानमाले’त बोलत होते.

सरकारने विशेष धोरण राबवणे गरजेचे
रामदास माने पुढे म्हणाले की, उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार व्हावे, उद्योगांसाठी शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक तयारी होणे खूप गरजेची असून हे केल्यानंतर उद्योजक तयार होऊ शकतील. उद्योग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहनशक्ती लागते. तरुणांना घडलेले उद्योगांमधील यश आणि अपशय या दोन्हींची उदाहरणे देणे गरजेचे आहे. आपल्याकडील तरुण जास्त काळ तग धरत नाहीत. ही परिस्थिती सर्वांनी मिळून बदलायला हवी, यासाठी सरकारने देखील विशेष धोरण राबवणे गरजेचे आहे. तसेच प्रस्थापित उद्योजकांनी देखील पुढकार घेऊन नवोदित उद्योजकांना मार्गदर्शन केले पाहिजे.

पुनर्वापरावर भर द्यावा
सरकारने पर्यावरणाच्या दृष्टीने प्लॅस्टिक व थर्माकोल पुनर्वापरावर बंदी घातली आहे. हे चांगले आहे, परंतु थोडा विस्तृत विचार केल्यास यातही रोजगाराच्या संधी आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजनपूर्वक काम केल्यासरी सायकलिंग उद्योग तयार होतील.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी.अग्रवाल, सचिव मधुलता शर्मा, कोषाध्यक्ष अ‍ॅड.महेशदत्त तिवारी व पदाधिकारी तसेच प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी केले. प्रा.अनंत भिडे, प्रा.धीरज पाटील, प्रा.सचिन हरीमकर, प्रा.अतुल गाजरे, प्रा.प्रफुल्ल वानखेडे, प्रा.अनिकेत पाठक यांनी परिश्रम घेतले.