नोकरीचे आमिष दाखवून महिलेची सौदीमध्ये विक्री

0

हैदराबाद : सलमा बेगम नावाची हैदराबाद येथील एक मध्यमवयीन महिला सौदीमध्ये फसली आहे. इथून तिला नोकरीच्या निमित्ताने तिथे नेण्यात आले. अक्रम व शफी नावाच्या दलालांनी तिला तिकडे पाठवले होते. पण तिथे पोहोचल्यावर त्यांनी सलमाला कुणा श्रीमंत अरबाला तीन लाखांत विकून टाकले. ज्या घरात सलमा काम करत होती, तिथेच तिचा शारीरिक छळ सुरू झाल्यावर तिने तक्रार केली. पण उपयोग झाला नाही. तिची किंमत मोजली असल्याने खरेदीदार कफीलने तिला परत भारतात पाठवण्यास नकार दिला आहे.

सलमाने कसा तरी आपल्या घरी निरोप दिला व आपली अवस्था कळवली. त्यानंतर तिची कन्या समिनाने दलाल अक्रम व शफी यांच्याकडे धाव घेतली. त्यांनीही सलमाला माघारी आणायचे आश्‍वासन दिले होते. पण दोन महिने उलटून गेले तरी कुठलीही हालचाल झालेली नाही. साहजिकच समिनाने आपल्या आईच्या सुटकेसाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पण तिथेही तिला थंड प्रतिसाद मिळाला आहे. पोलिसांनी अक्रम वा शफी यांच्याविरोधात कुठलीही कारवाई केलेली नाही.

आखाती देशात काफला नावाची व्यवस्था असून, त्यानुसार परदेशातून कामासाठी येणार्‍या कुणालाही स्थानिक नागरिकाने प्रायोजित करावे लागते. तसे केल्यावर त्याच नागरिकाची सर्व जबाबदारी असते. त्याला कफील म्हणून ओळखले जाते. असे कफील एकप्रकारे प्रायोजित परदेशी कामगार लोकांना गुलामासारखे वागवतात. सलमा तशाच जाळ्यात फसली आहे. अशा कफीलचे दलाल-एजंट भारतात वा अन्य गरीब देशात पसरलेले असतात. तेच गरजू लोकांना जाळ्यात ओढून कफीलच्या गुलामगिरीत ढकलून देत असतात. सलमाची कन्या समिनाने आता तेलंगणा व भारत सरकारकडे दाद मागण्याचे प्रयास सुरू केले आहेत.