सणसवाडी । युवकांना नोकरी मिळवून देणार्या एजंटांचे मोठे जाळे तयार झाले आहे. नोकरी मिळवून देण्यासाठी युकांकडून पैसे उकळले जातात. अशाच पद्धतीने सणसवाडी येथील तिघांना 3 लाख 80 हजार रुपये घेऊन बनावट नियुक्ती पत्र देऊन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत प्रवीण ज्ञानदेव बोरकर (वय 24, रा. मांजरी) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अमितकुमार (पूर्ण नाव माहित नाही) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रवीणकुमार आणि त्याचे सुरेश व अमोल हे दोन मित्र नोकरी शोधात असताना त्यांना इंडीड नावाच्या वेबसाईटवर नोकरीबाबतची एक जाहिरात दिसली. त्यांनी त्यावरून अमितकुमारशी संपर्क साधला. त्याने नोकरीचे आमिष दाखवून पैशांची मागणी केली.
कागदपत्रे आणि 60 हजार रुपय सुरुवातीला मागितले. त्यांनतर या तिघांना सणसवाडी येथील सिनटेक्स बिएपीएल कंपनीत बोलाविण्यात आले. यावेळी अमितकुमार देखील तेथे आला. तेथे प्रदीप शुक्ला नावाच्या व्यक्तीने तिघांची मुलाखत घेतली. त्यांनतर तिघांना कंपनीचे नियुक्तीपत्र दिले. दरम्यानच्या काळात अमितकुमारने या तिघांकडून वेळोवेळी 3 लाख 80 हजार रुपये घेतले. त्यांनतर अमीतचा फोनच लागला नाही. म्हणून त्यांनी कंपनीत जाऊन चौकशी केली असता त्यांना दिलेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे समोर आले. त्यांनतर तिघांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवशांत खोसे करीत आहेत.