बांभोरी गावाजवळील घटना: पतीने चैन ओढून थांबविली गाडी
जळगाव – चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्यानंतर रायपूर येथील नोकरी सोडून राजकोट येथे रेल्वेने जात असताना सूर्या सनिस कृष्णनकृती वय 27 रा. नांगीयार कुरणंलरा पो. पेल्लीमनुर ता. पोट्टलयम जि. आलपी या केरळ राज्यातील विवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना 27 रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान अपघातानंतर सोबत असलेल्या महिलेच्या पतीने चैन ओढून रेल्वे थांबविली. व रेल्वे कर्मचार्यांच्या मदतीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनिश कृष्णनकृती वय 30 आणि त्यांची पत्नी सूर्या सनिस कृष्णनकृती वय 27 रा. नांगीयार कुरणंलरा पो. पेल्लीमनुर ता. पोट्टलयम जि. आलपी (केरळ) हे दोघे छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथे दोन महिन्यांपासून आयुर्वेदिक दुकानावर काम करत होते. पुढे त्यांना गुजराज राज्यातील राजकोट येथे जास्त पगाराची नोकरी संधी चालून आली. यासाठी दोघांनी रायपूर येथे आपल्या कामाचा राजीनामा दिला.
नातेवाईक सायंकाळपर्यंत होणार जळगावात दाखल
दोघेही पती-पत्नी रेल्वेने राजकोट येथे रेल्वेने जात असतांना 27 रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पाळधी दरम्यान बांभोरी गावाजवळ सूर्या रेल्वे दरवाजाजवळ उभी असतांना तोल जाऊन खाली पडली. पत्नी खाली पडल्याचे लक्षात आल्यानंतर सनीशने तत्काळ चैन ओढून रेल्वे थांबवली व झालेला प्रकार रेल्वे कर्मचार्यांना सांगितला. यानंतर पाळधी येथील रेल्वे कर्मचार्यांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगावात राहणारे केरळ राज्यातील नागरिकांनी कोणताही विलंब न करता जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन मदतकार्य केले. सायंकाळी मुंबईहून त्यांचे नातेवाईक जळगावला येण्यासाठी रवाना झाले आहेत.