नोकरीच्या बहाण्याने  गंडवले ः रेल्वेचा टेक्नीशियन जाळ्यात

0

पोस्टात नोकरी लावून देतो म्हणून उकळले नऊ लाख रुपये:  दुसर्‍या पसार आरोपीचा कसून शोध सुरू

भुसावळ- पोस्टात नोकरीला लावून देतो, असे आमिष दाखवून शहरातील किशोर वाघनाथ भालेराव (55, मोहित नगर, गणेश कॉलनीमागे, भुसावळ) यांची तब्बल नऊ लाखात फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध भुसावळ शहर पोलिसात 28 सप्टेंबर 2017 रोजी गुन्हा दाखल होता. या प्रकरणी पसार असलेल्या व रेल्वेतील एमओएचमधील टेक्नीशीयन भूषण प्रभाकर इंगळे (32, सुतार गल्ली, भुसावळ) यास गुरुवारी शहर पोलिसांनी अटक केली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्या.एस.डी.गरड यांनी त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
वर्षभरापासून पसार आरोपीच्या आवळल्या मुसक्या
आरोपी भूषण इंगळेसह सुरज रामा तेलगोटे (निगडी, पुणे) यांनी तक्रारदार किशोर भालेराव यांच्या मुलांना पोस्टात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने फसवले होते. भूषणच्या खात्यावर दिड लाख तर सुरज तेलगोटच्या खात्यावर तब्बल साडेसात लाखांची रक्कम आरटीजीएसद्वारे ट्रान्सपर करण्यात आली होती. वेळोवेळी संपर्क साधूनही नोकरी न लागल्याने फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तर आरोपी भूषणने भुसावळ सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर तो नामंजूर करण्यात आला. शहर पोलिसांनी आरोपीला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास उपनिरीक्षक विशाल पाटील, विशाल मोहे, सोपान पाटील करीत आहेत.
फसवणूक झालेल्यांना आवाहन
शहर पोलिसांनी अटक केलेला रेल्वेचा टेक्नीशीयन भूषण इंगळे व पसार असलेल्या सुरत तेलगोटे यांनी शहरातील नागरीकांना तसेच काही बेरोजगारांना फसवले असण्याची दाट शक्यता आहे. अशा तक्रारदारांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता व घाबरा शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे आवाहन शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांनी केले आहे. या गुन्ह्यातील संशयीत सुरज तेलगोटे पसार असून त्याचादेखील कसून शोध सुरू आहे.