नोकरीच्या मागे न लागता गरजुंना नोकर्‍या देणारे व्हा!

0

नवी सांगवी : दहावी-बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे उच्च शिक्षण घ्यावे. संकटे, अडचणींना न घाबरता जिद्दीने अभ्यास करावा. आपल्याला आवड असलेल्या क्षेत्रात उत्तम करिअर करावे. आज सर्वच क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे नोकरी सहजासहजी मिळत नाही. नोकरीऐवजी उद्योग-धंदा करुनही जीवनात यशस्वी होता येते. त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता यशस्वी उद्योजक होऊन गरजुंना नोकर्‍या देणारे व्हा, असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले. पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळ व शहर सुधार समिती सदस्य शशिकांत कदम यांच्या वतीने आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात मनोगत व्यक्त करताना आमदार जगताप बोलत होते.

यांची होती उपस्थिती
या समारंभाला पोलीस पाटील जयसिंग जगताप, गणेश बँकेचे अध्यक्ष सूर्यकांत गोफणे, माजी नगरसेवक शंकर जगताप, पोपट जगताप, माऊली जगताप, महिला पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता कुदळे, अलका सरग, शिवलिंग किणगे, मधुकर नवले, दामोदर काशिद, नगरसेवक सागर अंगोळकर, अंबरनाथ कांबळे, हर्षल ढोरे, नगरसेविका उषा मुंढे, चंदा लोखंडे, जवाहर ढोरे, महेश जगताप, अजय दुधभाते, प्रदीप ननवरे, शशिकांत दुधारे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकांनी मुलांशी संवाद ठेवावा
पालकांनी आपल्या इच्छा-आकांशा मुलांवर लादू नये. त्यांना आवड असलेल्या क्षेत्रातच त्यांना करिअर करू द्यावे. पालकांनी नेहमी आपल्या मुलांशी संवाद ठेवला पाहिजे. त्यामुळे मुलांना प्रोत्साहन व योग्य मार्गदर्शन मिळते. मुलांनी आपल्या परिस्थितीचे भान ठेऊन जोमाने अभ्यास करावा. उत्तम यश संपादन करावे, असे आवाहनदेखील आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

दीड हजार विद्यार्थ्यांना गुणगौरव
या समारंभात एक हजार पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. पिंपळे गुरव परिसरातील सर्वच उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व प्रमाणपत्र देण्यात आले. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी केले. या कार्यक्रमाला पालकवर्ग, परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.