नंदुरबार येथे खासदार प्रकाश आंबेडकर : बहुजन वंचित आघाडीचा मेळावा
नंदुरबार- मराठ्यांना नोकर भरतीत 16 टक्के आरक्षण देण्याची जी भूमिका शासनाने घेतली आहे ती न वाजणारी गाजराची पुंगी आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मराठ्यांना असे प्रकारचे कोणतेही आरक्षण देता येणार नाही, असे स्पष्टीकरण भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार प्रकाश आंबेडकर यांनी नंदुरबार येथे बोलतांना केले. शिवाजी नाट्य मंदिरात शुक्रवारी बहुजन वंचित आघाडीचा मेळावा झाला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
व्यासपीठावर यांची उपस्थिती
व्यासपीठावर माजी आमदार विजय मोरे, जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे, नाना ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित आघाडीची स्थापना करण्यात आली. या आघाडीच्या माध्यमातून त्यांनी ठिकठिकाणी दौरे सुरू केले आहे. या दौर्याच्या माध्यमातून खासदार प्रकाश आंबेडकर हे संवाद साधत असून विविध वंचित समाजातील घटकांना सोबत घेऊन आगामी राजकीय रणनीती आखली जात आहे.
निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मराठ्यांना आरक्षणाचे गाजर
यावेळी मार्गदर्शन करतांना खासदार प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण या मुद्यावर अधिक भर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत ते म्हणाले की, महा नोकरभरतीत मराठ्यांना 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा शासनाने केली आहे पण सुप्रीम कोर्टाच्या निदेशानुसार ते कदापिही शक्य नाही, जर आर्थिक निकषांवर आरक्षण द्यायचं म्हटले तर घटनाच बदलावी लागेल, ही वस्तुस्थिती आहे. केवळ निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मराठयांना आरक्षण देण्याचे गाजर दाखविले जात आहे, असे सांगून ते म्हणाले की, आरक्षणाच्या प्रश्नावर ज्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत, ते फसवे आहेत. मराठा आंदोलनाबाबत मुख्यमंत्री केवळ तमाशा पाहत आहेत. काही मंडळी आरक्षण प्रश्नावरून देशात दंगलीचे वातावरण निर्माण करत आहेत म्हणून देशातील विसंगती वाद दूर होणे गरजेचे आहे. देशाची प्रगती झाली पण माणुसकीची प्रगती झालेली नाही. जो पर्यंत माणुसकीची प्रगती होत नाही तोपर्यंत विकास होणार नाही, त्यासाठी वंचित घटकांना व्यासपीठ देण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे, येणार्या निवडणुकांमध्ये ही आघाडी देशाचा राजकारणाचा पायंडाच बदलून टाकणार आहे,त्या साठी या आघाडीला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केलं.