भुसावळ शहर शिवसेनेतर्फे नोटबंदीचा स्मृतीदिन ; एसबीआयच्या एटीएमला बेशर्मीचे झाड लावून निष्क्रीय बँक अधिकार्यांचा निषेध
भुसावळ- ऐन दिवाळीच्या काळात शहरातील एटीएममध्ये ठणठणाट असल्याने ग्राहकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. बँक प्रशासनाच्या एकूणच मनमानीविरोधात ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण असतानाच 8 नोव्हेंबरला नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण झाल्याने भुसावळ एसबीआय शाखेतील एटीएमला बेशर्मीचे झाड लावून निषेध करण्यात आला. ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, त्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास परीणाम बँकांना भोगावे लागतील असा इशारा सुद्धा देवेंद्र पाटील यांनी प्रसंगी दिला.
90 टक्के एटीएम ठरले ‘शो पीस’
ऐन दिवाळी सणाच्या काळात शहरातील एटीएम यंत्रात ठण-ठणाट होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ग्राहक एटीएम मशिनमध्ये रोकड आहे का नाही? याची चौकशी करत होते. त्यामुळे ग्राहकांची सणासुदीत धावपळ झाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. भुसावळ शहरामध्ये विविध शाखेचे एटीएम मशिन आहेत परंतु 90 टक्क्यांहुन जास्त ठिकाणी यंत्रात रोकड नसल्याने मात्र ऐन सणासुदीत ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला. काही शाखेच्या एटीएम मशिनच्या शटरवरच कॅश उपलब्ध नसल्याचे बोर्डही लावले होते. सणासुदीत तरी एटीएममध्ये जादा रोकड भरणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरीकांतून उमटल्या. एटीएममध्धये पैसेच नसल्याने मात्र अनेकांनी स्वाईप मशिनचा आधार घेतला परंतु सर्वत्रच स्वाईप मशीन नसल्याने आणि काहींना याबाबत माहिती नसल्याने मात्र उसनवारीने व्यवहार करावा लागला. सणासुदीतही एटीएममध्ये रोकड नसल्यामुळे बँक प्रशासनाविषयी नागरीकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
बेशरम बँक अधिकार्यांचा असाही निषेध
बेशरम प्रशासनाला जाग आणण्यासाठी देवेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात 8 नोव्हेंबर रोजी भुसावळ एसबीआय शाखेतील एटीएमला बेशर्मीचे झाड लावून निषेध करण्यात आला. ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, त्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास परीणाम बँकांना भोगावे लागतील, असा इशारा सुद्धा देवेंद्र पाटील यांनी दिला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख देवेंद्र पाटील, शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन, शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शिवसेना भुसावळ शहर प्रमुख बबलू बर्हाटे, माजी शहर प्रमुख नामदेव बर्हाटे, महिला आघाडी शहर संघटिका वासंती चौधरी, तालुका युवा अधिकारी हेमंत बर्हाटे, शहर युवा अधिकारी सुरज पाटील व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.