नवी दिल्ली : सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांनाच नोटबंदीचा फटका बसला असून, नोटबंदीमुळे देशातील अब्जाधीशांची संख्या घटली आहे. मात्र रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे अब्जाधीशांच्या यादीतील स्थान नोटबंदीनंतरही अव्वल आहे. हुरन ग्लोबल रिच या आंतरराष्ट्रीय संस्थेने देशातील अब्जाधीशांची यादी तयार केली आहे. यात देशातील अब्जाधीशांच्या संख्येत घट झाल्याचे सांगण्यात आले.
नोटाबंदीचा 11 उद्योजकांना फटका
अब्जाधीशांच्या या यादीत भारतातील 132 जणांचा समावेश करण्यात आला आहे. यात अव्वलस्थानावर रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी असून, त्यांची संपत्ती एक लाख 75 हजार कोटी रुपये आहे. दुसर्या स्थानावर एस. पी. हिंदुजा असून, त्यांची संपत्ती 1 लाख एक हजार कोटी रुपये आहे. तिसर्या स्थानावर सन फार्माचे दिलीप संघवी आहेत. नोटबंदीपूर्वी अब्जाधीशांच्या या यादीत संघवी यांचे स्थान दुसरे होते. पण नोटबंदीनंतर ते घसरुन तिसर्या स्थानावर आल्याचे संस्थेने म्हटले आहे. नोटबंदीची फटका देशातील 11 उद्योजकांना बसला असून यादीतील त्यांचे स्थान घसरले आहे.
काळा पैसा आला नाही, पण उद्योगधंदे अडचणीत!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा आणि भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. पण त्यातून काळा पैसा तर बाहेर आलाच नाही उलट अनेक उद्योगधंदे लयास गेले. याचा फटका उद्योजकांबरोबरच सामान्य नागरिकांनाही बसला हे यादीमुळे स्पष्ट झाले आहे.