नोटबंदी हे विनाकारण केलेले साहस

0

मनमोहनसिंग यांनी नोटबंदीला म्हटले अनावश्यक कृती

मोहाली : भारतात करण्यात आलेली नोटबंदी हेे विनाकारण केलेले साहस होते. याची देशाला काहीच गरज नव्हती. लॅटिन अमेरिका सोडल्यास कोणत्याच लोकशाही देशात आजपर्यंत नोटबंदी यशस्वी झालेली नाही, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केले. इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (आयएसबी) लीडरशीप समिटमध्ये बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. डॉ. सिंग यांनी यापुर्वीही नोटबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले होते.

अर्थव्यवस्था सतत खाली जात आहे
मनमोहनसिंग म्हणाले, तांत्रिक आणि आर्थिक दृष्टीने नोटबंदीचा निर्णय योग्य नव्हता. नोटबंदीच्या निर्णयापासून गेल्या वर्षभरात देशाची अर्थव्यवस्था सतत खाली जात आहे. सर्वांना माहित आहे की 1991 मध्ये आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेची कूस बदलली. तेव्हा जीडीपीमध्ये मोठी वाढ झाली आणि दारिद्रय रेषेखालील आयुष्य जगणार्‍या लोकांची संख्या झपाट्याने कमी झाली होती. माझे मत आहे की देशात अजूनही खूप मोठ्या शक्यता आणि संधी आहेत. मात्र त्यावर काम केले पाहिजे. काही आव्हानेही आहेत. उदाहरणार्थ आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रात आव्हाने आहेत. काही प्रॅक्टिकल उपाय योजनांचीही भारतीय अर्थव्यवस्थेला आवश्यकता आहे.