नाशिक । नोटाबंदीचा सामना करुन खचलेली जनता अजून पुरती सावरलेली नाही. त्यातच एटीएममध्येही नोटांची टंचाई जाणवत आहे. सरकारी निर्णयाच्या दिरंगाईमुळेच देशात चलनी नोटांची टंचाई झाली आहे. नाशिकरोडच्या नोटप्रेसमध्ये सहा डिनॉमिनेशनच्या नोटा छापल्या जातात. मात्र, धक्कादायक बाब अशी की, फक्त 20 आणि 50 रुपये मूल्य असलेल्या नोटांचीच छपाई सुरू आहे. वीस आणि शंभराच्या नोटांची नवीन डिझाइन केंद्र सरकारने अद्याप मंजूर न केल्यामुळे या नोटांची छपाई नाशिकरोड येथील प्रेसमध्ये थांबवली आहे. दोनशे आणि पाचशेच्या नोटांच्या छपाईसाठी विदेशी शाईचा तुटवडा निर्माण झाल्याने या नोटांचे उत्पादन थंडावले आहे. परिणामी देशात नोटांची तीव्र टंचाई जाणवत आहे.
स्टेट बँकेच्या सूत्रांकडून समजते की, नोटांची रखडलेली छपाई हे जसे एक कारण आहे, तसे नागरिकांची प्रवृत्ती हे दुसरे महत्त्वाचे कारण आहे. उपलब्ध नोटांमध्येही व्यवहार सुरळीत होऊ शकतात. मात्र, बँकेतून काढलेल्या दोनशे, पाचशे व दोन हजारांच्या नोटा परत बँकेत भरणा केल्या जात नसल्याने एटीएममध्ये ठणठणाट आहे. नोटा बँकेतून काढण्याचे प्रमाण वाढले आहे. भरणा तेवढा होत नाही. नोटांची तीव्र टंचाई जाणवत आहे.