नोटांवर डल्ला मारणारे हे तर डाकूच

0

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर ; भुसावळच्या सभेत पंतप्रधानांवर सडकून टिका

भुसावळ- नोटांवर डल्ला मारणारे हे डाकूच असून नोटबंदीमुळे व जीएसटीमुळे अनेकांच्या नोकर्‍या हिरावल्या गेल्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिटलरच्या दिशेने वाटचाल सुरू असून उद्या हे लोक तुम्हाला कारागृहातही टाकतील, अशी टिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली. वंचित बहुजन आघाडीचे रावेर लोकसभेतील उमेदवार नितीन कांडेलकर व जळगाव लोकसभेच्या उमेदवार अंजली बाविस्कर यांच्या प्रचारासाठी आरपीडी रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर गुरुवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री दशरथ भांडे, शरद वसतकर, भारीपचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, फिरोज खान, बाळा सोनवणे, सुदाम सोनवणे आदींसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्ता जावू लागताच मागासवर्गीय आठवले
अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली पाहीजे. केंद्रात असलेले भाजपा सरकार हे खोटारडे आहे. सत्ताधारी व विरोधक हे एकमेकांचे नातेवाईक असल्याने एकप्रकारे ही लोकशाहीची थट्टा आहे. धर्मांध व सेक्युलर शक्ती सत्तेत बसल्या पाहिजे, असे चित्र आहे. सत्तेला प्रतिष्ठा माणणार्‍यांना निवडून देणार का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. सत्ता जाण्याच्या भीतीने पंतप्रधान मोंदीनी आता त्यांची जात आठवली असून ते स्वतःला मागासवर्गीय म्हणत आहेत. मोदी यांनी स्वतःचे स्कूल लिव्हिंग सर्टीफिकेट जाहीर करावे तसेच कुठल्या विद्यापीठाकडून डिग्री घेतली हेदेखील सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले. मागासवर्गीयांना आरक्षण मिळाले मात्र विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप मिळाली नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही अ‍ॅड.आंबेडकर यांनी टीका केली.