नवी दिल्ली : नोटाबंदी लागू करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना चांगली होती. पण त्याची अंमलबजावणी करताना अनेक घोडचूका करण्यात आल्या. एकदा नोटाबंदी लागू केल्यानंतर दोन हजाराची नोट चलनात आणायची गरजच नव्हती. दोन हजाराची नोट बाजारात आणण्याचा घेण्यात आलेला निर्णय अनाकलनीय असून त्यामुळे काळा पैसा नष्ट करण्याच्या आणि कॅशलेस इकॉनॉमीला सुरूवात करण्याच्या उद्देशाला हरताळ फासला गेला आहे, असे स्पष्ट मत अमेरिकेतील नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ रिचर्ड थेलर यांनी व्यक्त केले. थेलर यांच्यासारख्या जागतिकदर्जाच्या अर्थतज्ज्ञाने असे मत व्यक्त केल्याने मोदी सरकारला आता नोटाबंदीतील चूका कबुल करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
दोन हजाराची नोट कशासाठी?
शिकागो विद्यापीठातील विद्यार्थी स्वराज कुमार याने थेलर यांच्याशी ट्विटर आणि ई-मेलद्वारे संवाद साधला. स्वराज यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीबाबत थेलर यांना काही प्रश्न विचारले होते. यावर थेलर यांनी खुप अभ्यासपुर्ण उत्तरे दिली आहेत. कॅशलेस सोसायटी निर्माण करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी ही संकल्पना खूप चांगली होती. परंतु ही संकल्पना लागू करताना अनेक चुका करण्यात आल्या. नोटाबंदी लागू केल्यानंतर तात्काळ दोन हजाराची नोट चलनात आणल्याने मुळ उद्देश्यावर पाणी फेरले गेले.
निर्णयाचे स्वागतही केले होते
विशेष म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 रोजी मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर थेलर यांनी ट्विट करून मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र त्यानंतर मोदी सरकारने घेतलेले निर्णय ऐकल्यावर त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. मोदी सरकारने दोन हजाराची नोट चलनात आणायला नको होती, असेही त्यांनी म्हटले होते.