नोटाबंदीनंतर आता नाणेबंदी?

0

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर आता मोदी सरकारने नाणेबंदी करण्याचे ठरविले असल्याची सुत्रांची माहिती आहे. केंद्र सरकारने 8 जानेवारी 2018 पासून नाण्यांचे उत्पादन थांबविले आहे. उत्पादन थांबवण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी नोटाबंदीनंतर सरकारने नाणेबंदीच्या दिशेने पावले उचलल्याची चर्चाही रंगली आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करत हजार आणि पाचशेच्या नोटा एका रात्रीत चलनातून बाद केल्या होत्या. याचे परिणाम सुमारे सहा महिने नागरिकांना भोगावे लागले होते. काळा पैसा व भ्रष्टाचारावर लगाम लावण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता. शेवटी यातून काहीच बाहेर आले नाही, असे रिझर्व्ह बँकेनेच जाहिर केल्याने ही नोटाबंदी टीकेस पात्र ठरली होती.

नाणी ठेवायला जागाच नाही
नोटाबंदीच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था थोडी सावरत असतानाच नाणेबंदीचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार भारतात नोएडा, मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद या चार ठिकाणच्या टांकसाळमध्ये नाण्याचे उत्पादन केले जाते. मात्र या चारही टांकसाळमध्ये नुकतेच नाण्यांचे उत्पादन करणे बंद करण्यात आले आहे. नोटाबंदीनंतर नाण्यांच्या उत्पादनात वाढ करण्यात आली होती. त्यामुळे बाजारात नाण्यांचा साठा वाढला. पण आता ही नाणी ठेवायला जागाच उरलेली नाही. कोट्यवधी रुपयांची नाणी अद्याप आरबीआयने घेतलेली नाहीत. त्यामुळे सरकारने नाण्यांचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

आरबीआयचा प्रतिक्रियेस नकार
सध्या 250 कोटी नाणी तयार असून ती टांकसाळात पडून आहेत. आरबीआयने ती नाणी घेतल्याशिवाय पुढील निर्मिती करणे शक्य नसल्याने हे उत्पादन थांबविण्यात आले. सध्या 1, 2, 5 आणि 10 रुपयांची नाणी चलनात आहेत. काही दिवसांपूर्वी आलेल्या 10 रुपयांच्या नाण्यांचा वापरही दैनदिंन व्यवहारासाठी मोठया प्रमाणात सुरु आहे. आरबीआयच्या प्रवक्त्यांनी यासंबंधी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असून टांकसाळ विभागाशी संबंधित अधिकारीच यावर प्रतिक्रिया देऊ शकतील, असे म्हटले आहे. केंद्र सरकारने नाण्यांचे उत्पादन थांबवले असले तरी त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आरबीआयकडे मुबलक प्रमाणात नाण्यांचा साठा आहेत, त्यामुळे नाण्यांचा तुटवडा भासणार नाही, असेही नमूद केले.