नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहार वाढले

0

मुंबई : केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे रोख व्यवहारांचे प्रमाण घटले आहे. देशातील जनता इ पेमेंट, मर्चेंट टर्मिनल आणि डेबिट व क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर करताना दिसते आहे. तसेच चेकद्वारे व्यवहार करण्यावरही लोकांनी भर दिला असल्याचे निरीक्षण आरबीआयने त्यांच्या अभ्यास अहवालात नोंदवले आहे.

रोख व्यवहार कमी झाले
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 हजार आणि 500 रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे रोख व्यवहार कमी झाले असून, कार्ड पेमेंट आणि डिजिटल व्यवहारांवर लोकांनी भर दिल्याचा दावा आरबीआयने अहवालात केला आहे. तसेच नोटाबंदीच्या आधी धनादेशाद्वारे होणार्‍या व्यवहारांचे प्रमाण अल्प होते त्यातही सुधारणा झाली आहे, असे आरबीआयच्या सांख्यिकी आणि सूचना विभागाचे शशांक शेखर मैती यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या अभ्यास अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

डेबिट, के्रडिट कार्डचा वापर वाढला
या आधीच्या एका अभ्यास अहवालात कार्ड पेमेंटवर लोकांनी भर दिल्याचे आरबीआयने म्हटले होते. सप्टेंबर 2017 या महिन्यात आरबीआयचा हा अभ्यास अहवाल समोर आला होता. सप्टेंबर 2017 या महिन्यात डेबिट आणि क्रेडिट कार्डने व्यवहार करण्याचे प्रमाण 84 टक्के वाढले होते. सप्टेंबर 2017 मध्ये देशात 74090 कोटी रूपयांचे व्यवहार हे कार्डद्वारे करण्यात आले. सप्टेंबर 2016 मध्ये हे प्रमाण 40,130 कोटी रुपये इतके होते.